दिव्यांग संघटनेतील पदाधिकाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी निवेदन
महाराष्ट्र 24 । पिंपरी । विशेष प्रतिनिधी । सन १९९२ पासून संयुक्त राष्ट्रसंघातर्फे जाहीर केलेला जागतिक अपंग दिन दरवर्षी डिसेंबर ३ रोजी जगभरात साजरा केला जातो. अपंग व्यक्तींबाबत सामान्य जनतेत जनजागृती निर्माण व्हावी. या उद्देशाने साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी पिंपरी येथील दिव्यांगांसोबत जागतिक अपंग दिन साजरा केला.
आमदार बनसोडे यांनी शहरातील दिव्यांग नागरिकांना शुभेच्छा दिल्या असून त्यांच्या कार्यालयामध्ये झालेल्या एका छोटेखाणी कार्यक्रमात आमदार बनसोडे यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या वेळी दिव्यांग संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी निवेदन दिले. निवेदनाद्वारे त्यांनी दिव्यांगांच्या अडचणींची जणू जंत्रीच आमदार बनसोडे यांच्या समोर मांडली.
पिंपरी-चिंचवड मनपाने दिव्यांग योजना राबविण्यासाठी सहाय्यक आयुक्त नेमावा, मनपा अर्थसंकल्पामध्ये दिव्यांग कल्याणकारी योजनांसाठी राखीव असलेला निधी नाविन्यपूर्ण योजनांची आखणी करून पूर्णपणे वापरावा, दिव्यांगांसाठी रोजगार व स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यक्रम महापलिकेने राबवावा. दिव्यांगांसाठी शासनाने आखून दिलेल्या अटींनुसार आरक्षणामध्ये तरतुदी ठेवण्यात याव्यात. तसेच त्याची अंमलबजावणी करावी. घरकुल अथवा पंतप्रधान आवास योजनेच्या पायाभूत रक्कमेत ५० टक्के सूट देण्यात यावी. मनपा रुग्णालये व दवाखान्यांमधून दिव्यागांना मोफत उपचार मिळावेत या मागण्यांसह १००० चौरस फुटांपर्यंत घर असलेल्या दिव्यांग नागरीकांस मिळकत करामध्ये ५० टक्के सवलत महानगरपालिकेने द्यावी, अशा मागण्यांसाठी दिव्यांग प्रतिनिधींनी आग्रह धरला. तर यावर केवळ आश्वासन नाही तर ताबडतोब ठोस कार्यवाही करणार असून, आचारसंहिता संपताच याबाबत पालकमंत्र्याकडे बैठक घेऊन पाठपुरावा करू, असे मत बनसोडे यांनी व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रमाला अपंग सेलचे अध्यक्ष अशोक कुंभार, आनंद बनसोडे, बाळासाहेब तरस, रवी भिसे, योगेश सोनार, गीता भिसे, किरण कांबळे, मोहम्मद शफी पटेल, दादासाहेब काशीद, किरण कांबळे, बाळासाहेब साळुंके, धनराज कांबळे आणि दिव्यांग बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.