महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ५ डिसेंबर – राज्यात लॉकडाऊनमुळे उद्योग-व्यवसाय यांच्यावर विपरीत परिणाम झाला होता. परंतु सध्या उद्योग-व्यवसाय पूर्ववत सुरु होत आहेत. अल्पसंख्यांक विकास व औकाफ, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांच्या निर्देशानुसार या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.राज्यात येत्या 12 आणि 13 डिसेंबर रोजी ऑनलाइन रोजगार महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात पुणे जिल्ह्यासह राज्यातील विविध खासगी कंपन्यांमध्ये सुमारे 65 ते 70 हजार रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
त्या अनुषंगाने www.roigar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यासह राज्यातील विविध उद्योग, व्यवसाय यांना नववी उत्तीर्णपासून दहावी, बारावी, आय.टी.आय., डिप्लोमा तसेच बी.ई. आणि इतर व्यावसायिक शैक्षणिक पात्रतेची किमान 65 ते 70 हजार रिक्तपदे भरण्यात येणार आहेत. इच्छुक युवक-युवतींनी 13 डिसेंबरपर्यंत पसंतीक्रम नोंदवून या रोजगाराच्या महापर्वणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त अनुपमा पवार यांनी केले आहे.
पुणे जिल्ह्यातील या कंपन्यांमध्ये भरती –
प्रिमियर सील्स, मरेली मदरसन ऑटो, व्होडाफोन इंडिया सर्व्हिसेस, महिंद्रा स्टील सर्विस सेंटर, एल.जी. इलेक्ट्रॉनिक्स प्रा. लि., हायर ऍप्लायन्सेस, महिंद्रा सीआयई ऑटोमोटीव्ह., मिंडा कॉर्पोरेशन लि., रुप पॉलिमर्स, बीएनवाय मेलन (बीपीओ, मास्टरकार्ड मोबाईल ट्रान्झॅक्शन सोल्युशन प्रा. लि., ऍडविक हाय-टेक, युकेबी इलेक्ट्रॉनिक्स, राधेय मशिनिंग, युरेका फोर्ब्स, फोर्स मोटार्स, वायका इन्स्ट्रमेन्टस, विल्यम्स कंट्रोल्स, जयहिंद सियाकी, कायनेटिक कम्युनिकेशन्स, एमक्युअर फार्मास्युटिकल्स या कंपन्यांनी रिक्तपदे नोंदवली आहेत.

अशी करा ऑनलाइन नोंदणी –
हा रोजगार मेळावा ऑनलाईन पसंतीक्रम नोंदविणाऱ्या उमेदवारांसाठीच.
पुणे जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी संकेतस्थळ www.rojgar.mahaswayam.gov.in
होमपेजवरील जॉब सीकर (Job Seekar) लॉगिनमधून युजर आयडी आणि पासवर्डच्या आधारे लॉगिन करावे.
त्यानंतर डॅशबोर्डमधील पंडीत दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर यावर क्लिक करुन प्रथम पुणे विभाग आणि त्यानंतर पुणे जिल्हा निवडून त्यातील STATE LEVEL MEGA JOB FAIR या रोजगार मेळाव्याची निवड करावी.
यानंतर उद्योजकनिहाय रिक्तपदांची माहिती घ्यावी.
आवश्यक पात्रतेनुसार ऑनलाईन पध्दतीने पसंतीक्रम नोंदवून मेळाव्यात सहभागी होता येईल.
उमेदवारांना पसंतीक्रमानुसार आणि उद्योजकांच्या सोईनुसार त्यांच्या मुलाखतीचे ठिकाण, दिनांक, वेळ एसएमएस, दूरध्वनी, ई-मेल किंवा सोईच्या माध्यमाद्वारे कळविण्यात येणार आहे. त्यानंतर ऑनलाईन किंवा ऑफलाईन मुलाखतींचे आयोजन करण्यात येईल.
