महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ५ डिसेंबर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी एक सर्वपक्षीय बैठक घेतली. यावेळी, कोरोना लशीच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलेलो आहोत, असं सांगतानाच देशवासियांना एक नवी आशा दिली. कोरोना लस देशात पहिल्यांदा आरोग्य सेवक, डॉक्टर आणि रुग्णांना दिली जाईल, असं म्हटलं जातंय. दरम्यान, भारतीय लस निर्मात्या कंपन्या आणि आयसीएमआर जागतिक पातळीवर लस निर्मात्या कंपन्यांच्या संपर्कात आहेत. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, काही आठवड्यांत लस तयार होऊ शकेल. यानंतर, तज्ज्ञांना लशीसंदर्भात हिरवा झेंडा मिळताच देशात लस अभियानाला सुरुवात होईल.
येत्या काही दिवसांत कोविड १९ लस तयार होऊ शकते. देशात जवळपास आठ लशींवर काम सुरू आहे, असंही पंतप्रधानांनी यावेळी स्पष्ट केलं. भारतात लशींच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर काम सुरू आहे. सध्या देशात तीन वेगवेगळ्या लशींची चाचणी वेगवेगळ्या टप्प्यांत सुरू आहे.
कोविड १९ लस वितरणासाठी केंद्र आणि राज्य सरकारला मिळून काम करावं लागणार आहे. यासाठी देशात कोल्ड चैनची व्यवस्था निर्माण करण्यावर आणखीन भर द्यावा लागणार आहे. कोरोना लशीसंदर्भात सर्वदलीय नेत्यांनी जो विश्वास व्यक्त केला आहे त्यामुळे कोरोनाविरुद्धच्या देशाच्या लढाईला आणखीन मजबुती मिळेल, असंही पंतप्रधान मोदींनी सर्वपक्षीय बैठकीला संबोधताना म्हटलं.
लशी संदर्भात सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा झालेली आहे तसंच सुचनाही विचारात घेण्यात आलेल्या आहेत. काही दिवसांपूर्वी भारतीय बनावटीची लस तयार करणा-या तज्ज्ञांशीही चर्चा करण्यात आली. आपले वैज्ञानिक कोरोना लशीसंदर्भात खूपच आश्वासक आहेत. जगभरात कोरोना लशीवर काम सुरू असलं तरी अनेकांचे डोळे लागलेत ते स्वस्त लशीवर आणि यासाठीच संपूर्ण जगाच्या नजरा भारतावर खिळलेल्या आहेत, असं सांगत मोदींनी यातील संधीही उजेडात आणून दिल्या.
कोरोना लशीच्या वाटपासंदर्भात गाईडलाईन्स बनवण्याचं काम सुरू आहे. लस बनवण्याची भारताची क्षमता जगातील इतर देशांपेक्षा नक्कीच उजवी आहे. आपल्याकडे मोठं नेटवर्क आहे, याचाही फायदा घेता येईल, असं म्हणत पंतप्रधानांनी लस वितरणाचा आवाका आणि आव्हानं सर्वपक्षीय बैठकीत समोर मांडली.
राज्यांबरोबर झालेल्या चर्चेमधून अनेक महत्वाचे सल्ले मिळाल्याचेही मोदींनी सांगितलं आहे. सध्या देशामध्ये आठ लसींची चाचणी सुरु असून त्यापैकी तीन लसी या पूर्णपणे भारतीय बनावटीच्या आहेत, अशी माहिती मोदींनी दिली आहे. कोरोनासंदर्भातील लसीसाठी फारशी वाट पहावी लागणार नाही असे स्पष्ट संकेत मोदींनी दिले आहेत. पुढील काही आठवड्यांमध्ये लस उपलब्ध होईल असे स्पष्ट संकेत मोदींनी आपल्या भाषणामध्ये दिले आहेत.
जागरुकता निर्माण करा…
एवढ्या मोठ्याप्रमाणात लसीकरण होते तेव्हा अनेक अफवा उठतात. या अफवा जनहीत आणि देशहिताच्या विरोधात असतात. सर्वांना मी आवाहन करतो की लोकांना या लसींसंदर्भात जागरुकता निर्माण करा आणि ते कोणत्याही अफवांना बळी पडणार नाही याकडे सर्वांनी लक्ष द्यावे.