महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ५ डिसेंबर – लासलगाव येथील मुख्य बाजार आवारात 3 दिवसांत कांदा दर 50 टक्के घसरल्याने उत्पादकाच्या डोळ्यातून कांदा आता पाणी काढू लागला आहे. शहरी भागात कांदा शंभरीवर गेल्याने इजिप्त आणि तुर्कस्तान येथून कांद्याची आयात आणि निर्यातबंदी, साठवणुकीवर मर्यादा यामुळे कांदा घसरला आहे. 1 डिसेंबला उन्हाळ कांदा सरासरी 3001 रुपये प्रतिक्विंटलने विकला गेला तर आज 1550 रुपये दर मिळत असल्याने 3 दिवसांत कांदा दर हे 1500 रुपयांनी घसरल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
पावसाच्या तडाख्यातून वाचलेल्या कांद्याला पाच ते सहा हजार रुपये क्विंटलपर्यंतचा भाव मिळू लागला होता. मात्र, शासनाने घातलेल्या अनेक निर्बंधामुळे कांदा दरात मोठी घसरण झाली आहे. कृषी विधेयकांमधील तरतुदींविरोधात दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलन सुरू असतानाच कांद्याचा दर कोसळल्याने कृषी विधेयकांमधील फोलपणा उघड झाला आहे. परराज्यातून कांद्याची आवक, कांद्याची आयात आणि निर्यातबंदीच्या रूपाने झालेल्या सरकारी हस्तक्षेपामुळे कांद्याचे भाव पुन्हा गडगडले आहेत. आज येथील मुख्य बाजार आवारात उन्हाळ कांद्याला सरासरी 1550 रुपये, तर लाल कांद्याला सरासरी 2600 रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. कांद्याच्या बाजारभावात मोठ्या प्रमाणात घसरण होत असल्याने कुटुंब कसे चालवावे आणि झालेला खर्च कसा काढावा, असा प्रश्न आता कांदा उत्पादकांसमोर उभा राहिला आहे. येथील बाजार समिती 593 वाहनांतून 6500 क्विंटल कांद्याची आवक होऊन उन्हाळ कांद्याला कमाल 2250 रुपये, सर्वसाधारण 1550 रुपये, तर किमान 700 रुपये इतका प्रतिक्विंटलला बाजारभाव जाहीर झाला, तर लाल कांद्याला किमान 1200, सरासरी 2600 तर जास्तीत जास्त 3091 रुपये प्रतिक्विंटल भाव जाहीर झाला.
