महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ५ डिसेंबर – राज्यातील विनाअनुदानित शाळांचा अनेक वर्षांपासून रखडलेला प्रश्न टप्प्या-टप्प्याने मार्गी लागत आहे. राज्यातील प्राथमिक स्तरावरील सुमारे 2160 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि 9884 उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी 1 नोव्हेंबरपासून 20 टक्के अनुदानाच्या कक्षेत आले आहेत. 28 हजार 271 शिक्षकांना आता पुढचा टप्पा देत 40 टक्के अनुदान लागू केले आहे. याबाबतचा शासन निर्णय आज जारी केला.
राज्यातील कायम विनाअनुदानित शाळांचा कायम शब्द काढला आहे. या शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदान देण्याचा निर्णय 2018 मध्ये घेण्यात आला होता. यानंतर पहिल्या टप्प्यात राज्यातील 2417 शाळा, 4561 तुकड्यांवरील 28 हजार 217 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 20 टक्के अनुदानाच्या कक्षेत आणले. आता या शिक्षकांना पुढचा टप्पा देण्यात येणार असून, त्यांना 40 टक्के वेतन सरकारकडून मिळणार आहे. याचबरोबर राज्यातील 276 प्राथमिक शाळा, 2031 तुकड्यांवरील 2851 शिक्षक पदे, 128 माध्यमिक शाळा 798 तुकड्यांवरील 2160 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच 1761 उच्च माध्यमिक शाळा 598 तुकड्या व 1929 अतिरिक्त शाखांवरील 9884 शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांना 1 नोव्हेंबरपासून 20 टक्के अनुदान देण्यात येणार आहे.