आवक वाढल्याने कांद्याचे दर घसरले

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ७ डिसेंबर – थेट शंभरी गाठणारा कांदा आता चाळीशीत आला आहे. नोव्हेंबरच्या अखेरीस व या महिन्यात कांद्याची आवक वाढल्याने भाव घसरले आहेत. कडाडलेले दरही उतरू लागल्याने सामान्य ग्राहकांना बराच दिलासा मिळत असून आगामी काळात आणखी दर उतरणार असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तविला आहे.

कोरोना संक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवरील लॉकडाउन व नंतरच्या अनलॉकमध्ये कांदा व भाजीपाल्याची आवक चांगलीच प्रभावित झाली. त्यानंतर दिवाळीपूर्वी कांद्याच्या मुख्य बाजारपेठेतील आंदोलनांची स्थिती, अतिपावसाने वाया गेलेला कांदा, यामुळे भाववाढीने उच्चांक गाठला होता. कांद्याचे दर शंभरीवर गेले होते.मध्यमवर्गीयांसह सामान्य ग्राहकांनी दरवाढीवर नाराजी व्यक्त केली. दरवाढीमागे साठेबाजीचाही प्रकार होता. चाळीत साठवलेला कांदा बाजारात आणून दर चढवत साठेबाजांनी नफा लाटला. गेली चार महिने ग्राहकांना चढ्या दराचा सामना करावा लागला.

आता नवा कांदा बाजारात येऊ लागला आहे. नाशिक व लासलगाव बाजारात रेलचेल आहे. निर्यातबंदीमुळे तिकडच्या कांद्याची स्थानिक बाजारातील आवक वाढली आहे. उन्हाळा कांद्याची लागवड वाढली असून यंदा बऱ्यापैकी उत्पादन होण्याचा अंदाज आहे. गतवर्षी साठवलेला उन्हाळ कांदा बाजारात मोठ्या प्रमाणात आला आहे. त्यात नाशिक व परप्रांतातून येणाऱ्या कांद्याची आवक वाढली आहे.

बाजारातील आवक नोव्हेंबरपासून वाढल्याने कांद्याचे दर चाळीशीवर आले आहेत. येथील बाजार समितीत शनिवारी (ता.५) नाशिक कांद्याची ३१५ क्विंटल आवक झाली व १२०० ते ३२०० रुपये भाव मिळाला. किरकोळ बाजारात याच कांद्याला चाळीस रुपयांचा दर मिळू लागला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *