महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ७ डिसेंबर – कोरोना साथीमुळे देशभर बिहारी मजुरांचे झालेले हाल आणि ससेहोलपट संपूर्ण देशाने पाहिली आहे. अशातच एका बिहारी स्थलांतरित मजुराच्या (Bihar migrants) मुलानं मात्र आकाशाला गवसणी घातली आहे. बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील सोन्संदी या खेड्यात राहणारा परप्रांतीय मजुराचा मुलगा राहुल कुमार (22) याने देशातील प्रमुख शैक्षणिक संस्थांमध्ये गणल्या जाणाऱ्या Roorkee येथील इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजी (IIT) येथून आपलं पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
राहुल कुमार यांचे वडील सुनील सिंह हे सुरतमधील पॉवर लूमवर रोजंदारीने काम करतात. ते 52 वर्षांचे आहेत. बिहारमध्ये त्यांच्या कुटुंबाच्या मालकीचा छोटासा जमीनीचा तुकडा आहे. पण तिथं चार भाऊ-बहिणीं आणि कुटुंबाची उपजीविका करणे शक्य नसल्यानं त्यांना गुजरातमध्ये स्थलांतर करणं भाग पडलं आहे.कोरोना साथीमुळे संस्थेनं यावर्षी डिजिटल माध्यमाच्या अधारे वार्षिक समारंभाचं आयोजन केलं होतं. या समारंभात मेटेलर्जिकल आणि मटेरियल इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक पूर्ण करणाऱ्या राहुलला सामाजिक कार्याबद्दल राष्ट्रपती डॉ. शंकर दयाल शर्मा सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आलं आहे.
राहुल कुमार हा शिक्षणात तर हुशार होताच, पण इतर सामाजिक कामांकडे देखील त्याचा नेहमी कल असायचा. त्याच्या या गुणांमुळे तो राष्ट्रीय सेवा योजनेचा (NNS) प्रमुख सचिवही झाला होता. या पदावर असताना त्याने केलेल्या कार्याबद्दल त्याला सुवर्ण पदकानं सन्मानित करण्यात आलं आहे.
राहुलने आता अमेरिकेच्या यूटा विद्यापीठात पीएचडी करण्यासाठी आणि तिथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करण्यासाठी शिष्यवृत्ती मिळवली आहे.
“आपल्या उत्कृष्ट नेतृत्वामुळे आणि व्यवस्थापकीय कौशल्यामुळे त्यांनी किमान एक हजार विद्यार्थ्यांच्या टीमचे नेतृत्व केलं आहे. विविध कार्यक्रम पार पाडण्यासाठी त्याने अनेक महाविद्यालयीन प्रशासन, सरकारी अधिकारी आणि स्वयंसेवी संस्था यांच्याशी चांगला जनसंपर्क प्रस्थापित केला आहे. युवा नेतृत्व म्हणून त्याने केलेले केलेल्या विविध कामांची दखल पुरस्कारांच्या माध्यमातून घेतली आहे, असं IIT Roorkee चे संचालक अजित चतुर्वेदी यांनी सांगितलं.