महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ७ डिसेंबर – मुंबई-महाराष्ट्रात रक्त तुटवडय़ाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. मुंबईत आयोजित केलेल्या या उपक्रमात मान्यवरांसह शेकडो मुंबईकरांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्यामुळे पुरेसा रक्तसाठा उपलब्ध होऊ लागला आहे. आगामी काळात ही मोहीम आणखी व्यापक प्रमाणात राबवली जाणार आहे.
कोरोना काळात राज्यातील रुग्णालयांमध्ये मोठय़ा प्रमाणात रक्तटंचाई निर्माण झाली आहे. मोठी रुग्णालये आणि रक्तपेढय़ांमध्येही रक्ततुटवडा निर्माण झाला आहे. अवघे पाच ते सात दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा जमा असल्याने आगामी काळात रक्तटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. कोरोनाविरोधातील लढय़ात डॉक्टर्स, नर्स, आरोग्य कर्मचारी पोलिसांसह अनेक कोविड योद्धा आपले योगदान देत आहेत. मात्र असे असताना रक्ततुटवडा निर्माण झाल्यास आगामी काळात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे राज्यातील जनतेने सामाजिक भान जपण्यासाठी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून रक्तदान शिबिरांचे आयोजन होत आहे.