महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ७ डिसेंबर – भारताची अर्थव्यवस्था आर्थिक वर्ष 2021-22 च्या अखेरीस कोरोनापूर्व स्थितीत पोहोचेल, असे मत नीती आयोगाचे व्हाईस चेअरमन राजीवकुमार यांनी व्यक्त केले. चालू आर्थिक वर्षात जीडीपीतील घट आठ टक्क्यांहून कमी असेल, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. या आधी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानेही चालू आर्थिक वर्षात जीडीपीचा अंदाज -9.5 टक्क्यांवरून बदलून -7.5 केला होता.
राजीवकुमार म्हणाले की, आर्थिक वर्ष 2021-22 च्या अखेरपर्यंत देशाचा जीडीपी कोरोनापूर्व स्थितीत पोहोचण्याची आशा आहे. सध्या अर्थव्यवस्थेत उत्तम रिकव्हरी होत आहे. सप्टेंबर तिमाहीत उत्पादन क्षेत्रात दिसून आलेल्या तेजीने जीडीपीमध्ये 7.5 टक्के घट नोंदवली. त्या आधी जीडीपीमध्ये 10 टक्के घट होईल, असे अंदाज व्यक्त झाले होते. पहिल्या तिमाहीत जीडीपीमध्ये -23.9 टक्के घट झाली होती.
बँकिंग क्षेत्रात विस्तार होण्यासह स्पर्धेचीही गरज आहे. कारण भारताचा जीडीपीशी कर्जाच्या प्रमाणात 50 टक्के फरक आहे, तर अन्य उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमध्ये हे प्रमाण 100 टक्क्यांहून अधिक आहे. त्यामुळे खासगी कर्जे वाढण्याची शक्यता आहे. बँकिंग क्षेत्र विस्तारेल तेव्हाच हे होईल. याशिवाय सरकार सेंद्रीय शेतीसाठीही प्रोत्साहन देत आहे. त्यामुळे पर्यावरणासह शेतकर्यांच्या उत्पन्नावरही सकारात्मक परिणाम होईल असे, राजीव कुमार म्हणाले.