महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ८ डिसेंबर – मालिका विजयाने फाॅर्मात असलेला भारतीय संघ आज यजमान ऑस्ट्रेलिया टीमचा सुपडा साफ करण्याच्या इराद्याने मैदानावर उतरणार आहे. असा पराक्रम गाजवण्याची माेठी संधी टीम इंडियाला आहे. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात आज मंगळवारी मालिकेतील तिसरा आणि शेवटचा टी-२० सामना रंगणार आहे. सिडनीच्या मैदानावर दुसरा सामना जिंकून भारताने रविवारी ऑस्ट्रेलियावर मालिका विजय संपादन केला. यातून भारताने या मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली. संघ आता विजयी हॅट्ट्रिक साजरी करताना ऑस्ट्रेलियाला तिसऱ्यांदा पराभूत करणार आहे. भारताला चार वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात यजमान टीमचा सुपडा साफ करण्याची संधी आहे. भारताने २०१६ मध्ये आॅस्ट्रेलियाचा मालिकेत ३-० ने धुव्वा उडवला हाेता.
हार्दिक, लाेकेश राहुल फाॅर्मात :
भारतीय संघाच्या मालिका विजयामध्ये हार्दिक पांड्या आणि लाेकेश राहुलचे माेलाचे याेगदान राहिले. सलामी सामन्यात लाेकेश राहुलने अर्धशतकी खेळी केली. त्यानंतर त्याने दुसऱ्या सामन्यात ३० धावा काढल्या. याशिवाय हार्दिक पांड्याने आपल्या दर्जेदार कामगिरीत सातत्य ठेवले. त्याला मालिका विजय निश्चित करता आला. सलामीला १६ धावांची खेळी करणाऱ्या हार्दिकने दुसऱ्या सामन्यात नाबाद ४२ धावांची खेळी केली.
युवा गाेलंदाजांचे वर्चस्व : जसप्रीत बुमराह आणि शमीच्या अनुपस्थितीमध्ये सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्धचा किल्ला भारताचे युवा गाेलंदाज यशस्वीपणे लढवत आहेत. यात टी.नटराजन, दीपक चहर आणि शार्दूल ठाकूरचा समावेश आहे. यांनी लक्षवेधी गाेलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा मालिका विजयाचा प्रयत्न हाणून पाडला. यात खासकरून नटराजन हा लक्षवेधी कामगिरी करत आहे. त्याने आतापर्यंत पाच बळी घेतले.