आंदोलनाचा 18 वा दिवस : बळीराजा करणार उद्या उपोषण, राष्ट्रीय हायवेवर चक्का जाम

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १३ डिसेंबर – : कृषी कायद्यांविरुद्ध शेतकऱ्यांनी शनिवारी आंदोलन तीव्र केले. पंजाब, हरियाणा, राजस्थान व यूपीतील टोल नाके शेतकऱ्यांनी टाेलमुक्त केले. दिल्ली-जयपूर हायवे बंद करण्याची योजना रविवारपर्यंत टाळली. आपण सरकारसोबत चर्चेस तयार आहोत, मात्र त्यांनी आधी तिन्ही कायदे मागे घ्यावेत, असे शेतकरी नेते म्हणाले.

१४ डिसेंबरला शेतकरी देशभरात जिल्हा मुख्यालयांत धरणे आंदोलन करतील. सकाळी ८ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत शेतकरी उपोषण करणार असल्याची घोषणा शेतकरी नेत्यांनी केली. एनडीएचा मित्रपक्ष राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीचे अध्यक्ष हनुमान बेनीवाल यांनी दिल्लीकडे कूच करण्याची घोषणा केली. दरम्यान, दिल्लीकडे हजारोंच्या संख्येने शेतकऱ्यांचा ओघ सुरूच आहे.

सरकारमध्ये बैठकांचे सत्र : गृहमंत्री अमित शहा व कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांनी शनिवारी बैठका घेतल्या. हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटालांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, कृषिमंत्री तोमर व रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची भेट घेतली. चौटाला म्हणाले, पुढील २८ ते ४० तासांत सातव्या टप्प्यातील चर्चा होऊ शकते. ४० तासांत तोडगाही निघू शकतो. तोमर यांनी संध्याकाळी कृषी भवनात हरियाणाच्या काही शेतकरी संघटनांसोबत चर्चाही केली.

– दुष्यंत चाैटाला यांनी राजनाथ सिंह यांना सांगितले की, विरोध वाढत आहे. पक्षावर पाठिंबा काढण्याचा खूप दबाव आहे. एमएसपी ही शेतकऱ्यांची सर्वात मोठी चिंता असून आपण त्यावर कायदा आणला पाहिजे. अमित शहा व कृषिमंत्री तोमर यांच्या बैठकीतही यावर चर्चा झाली. पुढील चर्चेत शेतकऱ्यांना प्रस्ताव देण्याचे ठरले आहे. त्यात एमएसपीवर कायदा करण्याचे आश्वासन सरकार देऊ शकते. नव्या कायद्यांत ३ ते ४ दुरुस्त्यांच्या प्रस्तावावर विचार झाला.

– दरम्यान, कुंडली बॉर्डरवर पंजाबच्या शेतकरी नेत्यांची दुपारी २ ते रात्री उशिरापर्यंत बैठक सुरू होती. संध्याकाळी उशिरा ही बैठक संपून पत्रकार परिषद होणार होती. मात्र एका अधिकाऱ्याने फोनवरून शेतकरी नेत्यासांबत सरकारच्या पुढील प्रस्तावावर चर्चा केली. त्यावर शेतकरी नेते म्हणाले, काही लेखी प्रस्ताव आला तेव्हाच चर्चा होईल. यानंतर शेतकरी नेत्यांनी पुढील चर्चेसाठी मुद्द्यांवर खलबते सुरू केली. ही बैठक उशिरापर्यंत चालली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *