आजही पुण्यात पावसाची शक्यता

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १५ डिसेंबर – पुणे शहर आणि परिसरात मंगळवारी देखील (ता. १५) पावसाची शक्‍यता वेधशाळेने वर्तविली आहे. त्यामुळे छत्र्या कपाटात ठेवण्याची घाई आता करू नका. पुणे शहर आणि परिसरात आज सकाळपासून पावसाची रिमझिम पुन्हा सुरू झाली. रविवारी मध्यरात्री साडेबाराला पावसाच्या हलक्‍या सरी पडू लागल्या. सोमवारी सकाळपर्यंत त्याचा जोर वाढला. ऐन डिसेंबरमध्ये पावसाळा असल्याप्रमाणे पावसाला सुरवात झाली. दुपारी दोनपर्यंत या सरीवर सरी पडत होत्या. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्या दिवशी रेनकोट, जर्किन घालून कार्यालयात निघालेल्या पुणेकरांचे दृश्‍य रस्त्या-रस्त्यावर दिसत होते.

शहरात उद्या (मंगळवारी) आकाश अंशतः ढगाळ राहून, हलक्‍या स्वरुपाच्या पावसाची शक्‍यता हवामान खात्याने वर्तविली आहे. बुधवारी (ता. १६) आकाश मुख्यतः निरभ्र राहील, तसेच गुरुवारपासून (ता. १७) हवामान कोरडे होईल, असेही खात्यातर्फे सांगण्यात आले. शहरात शिवाजीनगर येथील वेधशाळेत पाच तर, लोहगाव येथे २ मिलीमीटर पाऊस दिवसभरात नोंदला गेला. ढगाळ वातावरण आणि पाऊस यामुळे कमाल तापमान पाच अंश सेल्सिअसने घसरून २३.६ अंश सेल्सिअस नोंदले गेले. डिसेंबरच्या सुरवातीला असलेली थंडी मात्र पळाली. किमान तापमानात ६.५ अंश सेल्सिअने वाढून १७.७ अंश सेल्सिअस झाले. पुढील चार ते पाच दिवसांमध्ये किमान तापमानाचा पारा १६ अंश सेल्सिअसपर्यंत कमी होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्रासह विदर्भाच्या काही भागात आकाश ढगाळ आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या थंड आणि कोरड्या वाऱ्यांमुळे राज्यात थंडी पडते. या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे दक्षिणेतून बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राच्या दिशेने वाहत आहेत. त्यामुळे पुण्या-मुंबईसह राज्याच्या काही भागात पाऊस हजेरी लावत आहे.

येत्या चोवीस तासांमध्ये पुण्यासह मुंबई, कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल. मराठवाड्यात हवामान कोरडे राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *