‘शाळेच्या फी’साठी खाजगी शाळांकडून विद्यार्थ्यांची ‘लूट’ ; आमदार महेश लांडगे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १६ डिसेंबर – पिंपरी चिंचवड शहरातील इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळांकडून ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. मात्र, त्यांच्याकडून भरमसाठ फी आकारली जात आहे. शाळांकडून शहरातील पालकांची आर्थिक लूट होत आहे. त्याबाबत पालकांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यामुळे शाळा व्यवस्थित सुरु होत नाहीत तोपर्यंत ‘ट्युशन फी’ आकारू नये. त्याबाबतचा अध्यादेश जारी करावा, अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आमदार महेश लांडगे यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेतली. यावेळी त्यांना निवेदन देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवडची संख्या २५ लाखांपेक्षा जास्त आहे. शहरात इंग्रजी माध्यमाच्या ५०० पेक्षाअधिक शाळा आहेत. या शाळांमध्ये सर्वसामान्य कुटुंबातील सुमारे एक लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. कोरोनाच्या महामारीत शहरातील शाळा एप्रिल २०२० पासून बंद आहेत. सध्या शाळांकडून ऑनलाइन शिक्षण सुरु केले आहे. मात्र, इंग्रजी शाळा प्रशासनाकडून ऑनलाईन शिक्षणाचे कारण देऊन मोठ्या प्रमाणात फी आकारली जात आहे.

तसेच, कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. अनेकांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. अशा मध्ये अधिकची फी आकारण्यात आल्याने सर्वसामान्यांची आर्थिक घडी विस्कळीत होणार आहे. अनेकांना फी देणे कठीण होत आहे. त्यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे खासगी शिक्षण संस्थेचे मालक व प्रशासन यांच्या विषयी पालकांच्या मनात असंतोष निर्माण झाला आहे. या बाबत पालकांनी वेळोवेळी तक्रारी दाखल केल्या असल्याचे आमदार महेश लांडगे यांनी नमूद केले. हा प्रश्न शासन दरबारी सोडविण्यासाठी फेडरेशन ऑफ अनएडेड प्रायव्हेट स्कूल ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र पाठपुरावा करत आहे.

त्यामुळे शाळा सुरळीत सुरु होत नाहीत तोपर्यंत इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी ट्युशन फी आकारू नये. त्याबाबतचे परिपत्रक काढावे, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *