गड आला पण सिंह गेला ! ‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’

Spread the love

महाराष्ट्र २४:- शिवकालीन इतिहासाची पाने चाळताना आपण मराठी मावळ्यांनी गाजवलेले पराक्रम अनेकदा ऐकले आहेत. बाजी पासलकर,कोंढाजी बाबा ,शिवा काशिद, बाजीप्रभू देशपांडे, नेताजी पालकर ,प्रतापराव गुजर यांसारख्या अनेक मावळ्यांनी वेळप्रसंगी स्वत:च्या रक्ताचा अभिषेक करुन स्वराज्याचे रक्षण केले. तान्हाजी मालुसरे हे देखील अशाच पराक्रमी मावळ्यांपैकी एक होते. ४०० वर्षांपूर्वी शूर योद्धा तान्हाजी मालुसरे यांनी कोंढाणा किल्ल्यावर गाजवलेला तो पराक्रम आजही आपल्याला प्रेरणा देतो. त्यांचा हा पराक्रम आता ‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या भेटीस आला आहे.

१६६५ साली शिवाजी महाराज व मुघल सरदार मिर्झा राजे जयसिंग यांच्यात पुरंदरचा तह झाला होता. या तहामध्ये स्वराज्यातील २३ किल्ले महाराजांना मुघलांच्या स्वाधीन करावे लागले होते. या तहानंतर तीन वर्षांनी पुन्हा एकदा शिवाजी महाराजांनी सर्व किल्ले स्वराज्यात आणण्याचा निश्चय केला. याची सुरुवात त्यांनी ‘पुरंदर’ या किल्ल्यापासून केली. पुरंदरच्या मोहिमेसाठी तान्हाजी मालुसरे यांची निवड केली गेली. अर्थात हे सर्व कथानक आपण यापूर्वी शिवकालीन इतिहासामध्ये अनेकदा वाचले आहे. हेच कथानक काहीसे ट्विस्ट करुन ‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’मध्ये दाखवण्यात आले आहे.कुठलीही कथा आणि त्याचा शेवट जर प्रेक्षकांना आधिक माहिती असेल तर अशा पटकथांवर चित्रपट तयार करणे आर्थिकदृष्ट्या अत्यंत जोखमीचे असते. कारण खरं पाहिले तर चित्रपटात प्रेक्षकांना नव्याने दाखवण्यासाखे वेगळे असे काहीच नसते. परंतु ओम राऊत यांनी हे आव्हान स्विकारले आणि प्रेक्षकांना अगदी शेवटपर्यंत खिळवून ठेवणाऱ्या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटात ओम राऊत यांनी कमालीचे दिग्दर्शन केले आहे. त्यांनी गोळा केलेली स्टार कास्ट, कथानकाची मांडणी, त्या कथेचे सादरणीकरण तसेच काही आवाक् करणारे ट्विस्ट निर्माण करुन त्यांनी एका उत्तम चित्रपटाची निर्मिती केली आहे.ऐतिहासिक चित्रपटांमध्ये अभिनयाला खूप महत्व असते. कारण पडद्यावर सादर होणाऱ्या व्यक्तिरेखा आपण अनेकदा पुस्तकांमधून वाचलेल्या असतात. त्यांचे व्यक्तिमत्व, त्यांची व्यक्त होण्याची पद्धत, त्यांची जीवनशैली, त्यांचे विचार आपण अनेक ऐतिहासिक कादंबऱ्यांमधून अनुभवलेलं असतं. परिणामी या ऐतिहासिक पात्रांबाबत आपल्या मनात एकरुपरेषा तयार होते. या रुपरेषेशी साधर्म्य साधणारे पात्रच आपण प्रेक्षक म्हणून अनेकदा चित्रपटात शोधतो. अशा अजरामर व्यक्तिरेखा रुपेरी पडद्यावर साकारणे कलाकारांसाठी खूप मोठे आव्हान असते. परंतु हे आव्हान अजय देवगण (तान्हाजी मालुसरे), सैफ अली खान (उदयभान राठोड), देवदत्त नागे (सुर्याजी मालुसरे), शरद केळकर (शिवाजी महाराज), काजोल (सावित्रीबाई मालुसरे) आणि इतर सर्व कलाकारांनी उत्तमपणे पेलले आहे. सर्व कलाकार त्यांना ठरवूनदिलेल्या भूमिकेत अगदी योग्य प्रकारे बसले आहेत. विशेषत: शरद केळकर याने शिवाजी महाराजांची भूमिका साकारताना त्यात केलेला अभिनय विशेष उठून दिसतो. सैफ अली खान या चित्रपटात खलनायक आहे. मात्र त्याच्या जबरदस्त टायमिंगमुळे अनेकदा तो अजय देवगणपेक्षा उठावदार दिसतो.चित्रपटात संगणकाचा वापर करुन निर्माण केलेल्या स्पेशल इफेक्ट्सचा (CGI) खूप मोठ्या प्रमाणावर वापर केलेला आहे. त्यामुळे चित्रपटात दिसणारी जवळपास संपूर्ण सिनेमॅटोग्राफी ही संगणकावरचीच आहे. परंतू कृत्रीम असूनही त्यातील जिवंतपणा आपण अनुभवू शकतो. चित्रपट पाहाताना चित्रीत केलेल्या प्रत्येक फ्रेममधून आपण ४०० वर्षांपूर्वीचा समाज, त्यावेळचे बांधकाम, निसर्ग, उंचच उंच गड यांचा आनंद घेऊ शकतो. अर्थात यातील CGI ची तुलना आपण ‘द लायन किंग’ किंवा ‘अॅलिटा द बॅटल एंजल’ यांसारख्या लाईव्ह अॅक्शन चित्रपटांशी करु शकत नाही. परंतु बॉलिवूडमधील आजवरचे सर्वोत्कृष्ट CGI असे आपण या चित्रपटाच्या बाबतीत म्हणून हा चित्रपट खरोखर पाहावा तो अॅक्शनसाठी. तान्हाजीमध्ये दाखवण्यात आलेले सर्व अॅक्शन सीन्स अंगावर रोमांच उभे करणारे आहेत. कुठलाच सीन फास्ट फॉरवर्ड किंवा गरज नसताना स्लो मोशनमध्ये दाखवण्यात आलेला नाही. त्यामुळे अॅक्शनपट चाहते या चित्रपटाचा मनमुराद आनंद घेऊ शकतात.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *