महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २२ डिसेंबर – कुडाळ – जिल्ह्यातील चिपी विमानतळाला दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्या, अशी मागणी भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी केली आहे. आमदार राणे यांनी ट्विट करून ही मागणी केली आहे.सध्या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आहे. या सरकारचे नेतृत्व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करत आहेत. चिपी हे तळकोकणातील विमानतळ सुरू करण्यासाठी शिवसेनाही उत्सुक आहे. यावेळी या विमानतळाला दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्या, अशी मागणी करून आमदार नितेश राणे यांनी शिवसेनेला कोंडीत पकडले आहे.
येत्या २६ जानेवारीपर्यंत या विमानतळाचे काम पूर्ण करण्याचे निर्देश एअर इंडियाचे अध्यक्ष तथा सिव्हिल एव्हीएशनचे सेक्रेटरी प्रदीप सिह खरोला यांनी आयआरबी कंपनीला दिले आहेत. या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी केलेले ट्विट शिवसेनेची कोंडी करणारे आहे.
आपल्या या ट्विटमध्ये आमदार नितेश राणे म्हणतात, ‘सन्माननीय नारायण राणे हे बाळासाहेबांचे सर्वात कडवट शिवसैनिक होते. चिपी विमानतळ हा खासदार राणे साहेबांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. म्हणून या विमानतळाला ‘दिवंगत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे विमानतळ’ हे नाव दिले पाहिजे. हे माझे वैयक्तिक मत आहे’, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.