महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २२ डिसेंबर – ऍडलेड येथे झालेल्या पहिल्या कसोटीत नामुष्कीजनक पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय संघात बरेच बदल होण्याची अपेक्षा असून अनुभवी यष्टिरक्षक वृद्धिमान साहा व युवा सलामीवीर पृथ्वी शॉ यांना उर्वरित कसोटीतून संघाबाहेर ठेवले जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या जागी शुभमन गिल, ऋषभ पंत तसेच केएल राहुल व गोलंदाज मोहम्मद सिराज यांना बॉक्सिंग डे कसोटीत स्थान दिले जाणार असल्याचे मानले जात आहे.
कसोटीआधी झालेल्या सराव सामन्यांत प्रभावी फलंदाजी करणाऱया शुभमन गिलला शॉचा बदली खेळाडू म्हणून पाहिले जात आहे. रोहित शर्मा ऑस्ट्रेलियात दाखल झाला आहे. पण क्वारंटाईनमुळे तो सिडनीत होणाऱया तिसऱया कसोटीपर्यंत उपलब्ध होऊ शकणार नाही. त्यामुळे दुसऱया कसोटीत गिलला संधी मिळणार आहे. साहा देखील फलंदाजीत चमक दाखवू न शकल्यामुळे पंतला संधी देण्याबाबत संघव्यवस्थापन विचार करीत आहे. आधीच्या ऑस्ट्रेलिया दौऱयात पंतने शतक नोंदवले होते. केएल राहुल व मोहम्मद सिराज हे आणखी दोन खेळाडू अंतिम अकरांमध्ये स्थान मिळविण्याच्या मार्गावर आहेत. कर्णधार विराट कोहली उर्वरित कसोटींसाठी उपलब्ध होणार नसल्याने तसेच मोहम्मद शमी जखमी झाल्याने त्यांना संघात स्थान देणे भाग पडणार आहे. शमीला फलंदाजी करताना उसळता चेंडू हाताला लागून त्याच्या मनगटाला प्रॅक्चर झाले आहे.
यष्टिरक्षक वृद्धिमान साहासाठी मात्र ही मालिका आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटची मालिका ठरण्याची शक्यता आहे. कारण युवा ऋषभ पंतला प्राधान्य देण्याचे व्यवस्थापनाचे धोरण आहे. उर्वरित तीन कसोटीत पंतने चांगले प्रदर्शन केले तर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतही त्याला संधी दिली जाऊ शकते. साहाचा विचार करता एसईएनए (सेना- द.आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया) देशांत त्याची फलंदाजी फारशी चमकदार झालेली नाही. या चारही देशात त्याला एकही अर्धशतक नोंदवता आलेले नाही, याचा त्याला फटका बसणार आहे. एमएसके प्रसाद निवड समिती अध्यक्ष असताना, साहा-पंत युतीबाबत निश्चित धोरण आखले असल्याचे त्यांनी सांगितले.
‘इंग्लंड, ऑस्ट्रेलिया यासारख्या ठिकाणी पंत हा पहिल्या पसंतीचा यष्टिरक्षक असेल, असे आपल्या समितीचे स्पष्ट धोरण ठरले होते. मायदेशातील सामन्यात बऱयाचदा सहाव्या क्रमांकावरील खेळाडूवर फलंदाजी करण्याची वेळ येत नाही. अशा वेळी स्पेशालिस्ट यष्टिरक्षकाला संघात स्थान देता येऊ शकते, अशी आमची भूमिका होती. गेल्या काही महिन्यांत पंतने आपल्या फिटनेसच्या समस्या दूर केल्या असून गुलाबी चेंडूने खेळलेल्या सराव सामन्यातही तो चांगल्या टचमध्ये दिसून आला आहे. त्यामुळे पुढील तीन कसोटीसाठी पंतला संघव्यवस्थापनाने स्थान दिले तर त्याला माझी पूर्ण सहमती असेल,’ असे प्रसाद यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
पृथ्वी शॉबद्दल बोलताना ते म्हणाले की, या 21 वर्षीय खेळाडूची प्रत्येक गोष्ट विरोधी ठरू लागली आहे. त्याचे तंत्र, टेंपरामेंट आणि खेळाकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन याबाबत भारतीय गोटात प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत. सूत्रांनी सांगितलेल्या माहितीनुसार, शॉ खराब फॉर्ममध्ये असूनही त्याला गिलऐवजी पहिल्या कसोटीसाठी पसंती देण्यात आली. कारण न्यूझीलंड दौऱयात त्याला खेळविण्यात आले होते आणि त्याला आणखी एक संधी देणे जरूरीचे होते. पण त्याने मिळालेली संधी वाया घालविली. आता त्याला आत्मपरीक्षण करावे लागणार आहे. प्रतिस्पर्ध्यांनी त्याच्या तंत्रातील उणीव अचूक हेरली आहे तर त्याचे क्षेत्ररक्षणही संथ आणि गचाळ होत असल्याचे आयपीएलपासूनच दिसून आले आहे. लाबुशेनचा एक अत्यंत सोपा झेल सोडल्याने संघाला त्याचा फटका बसला, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हनुमा विहारीला बढती देण्याचा विचार
कोहलीच्या अनुपस्थितीत हनुमा विहारीला बढती देण्याचा विचारही संघव्यवस्थापनाने चालविला असून एमएसके प्रसाद यांनीही त्याला पाचव्या क्रमांकावर खेळविणे योग्य ठरेल, असे म्हटले आहे. त्याच्याकडे उत्कृष्ट तंत्र आणि टेंपरामेंट असून तो संघासाठी दीर्घकाळपर्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शमी जखमी असल्याने मेलबर्न कसोटीत सिराजला पदार्पणाची संधी मिळणार आहे. सैनी व सिराज यापैकी एकाला संधी देण्याबाबत विचार सुरू असताना सिराजच्या कामगिरीचा विचार करून त्याला प्राधान्य देण्यात आले आहे.