महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २२ डिसेंबर – सैनिकांचा जिल्हा अशी ओळख असणाऱ्या सातारा जिल्ह्यातील आणखी एका जवानाला वीरमरण आले आहे. सातारा तालुक्यातील चिंचणेर निंब येथील जवान सुजित नवनाथ किर्दत शहीद झाले आहेत. जवान सुजित किर्दत हे 106 इंजिनिअर रेजिमेंटमध्ये सिक्किम येथे कर्तव्यावर होते.
सिक्कीममध्ये कर्तव्यावर असताना बर्फावरुन जिप्सी गाडी दरीत कोसळली. यामध्ये सुजित किर्दत यांना वीरमरण आले. सुजित किर्दत यांच्या निधनाची माहिती कळताच चिंचणेर निंब गावावर शोककळा पसरली आहे. जवान सुजित किर्दत यांचे पार्थिव मंगळवार(22 डिसेंबरला) चिंचणेरमध्ये येणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.
जवान सुजित यांच्या पश्चात पत्नी, दोन लहान मुले, वडील, भाऊ असा परिवार आहे. जवान सुजित किर्दत यांना वीरमरण आल्याची बातमी येताच चिंचणेर ग्रामस्थांनी अभिवादन करणारे फलक लावले आहेत.
सिक्कीमध्ये अपघातात तीन जवान शहीद
सिक्किमध्ये रविवारी भारत-चीन सीमेवर गस्त घालत असताना भारतीय जवानांची गाडी बर्फावरून घसरुन दरीत कोसळली. या दूर्घटनेत तीन जवान आणि जवानाच्या एका मुलाचा मृत्यू झाला आहे. सिक्कीममधील जवाहलाल नेहरु रोडवर नाथुलापासून 17 मैलावर ही दूर्घटना झाली.