सायबर पोलिसांची कारवाई, ; १४,००० फेक पोस्ट्‌स, ४०० गुन्हे दाखल; आर्थिक फसवणुकीचेही प्रकार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २४ डिसेंबर – लॉकडाऊनच्या काळात सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या १४ हजार फेक पोस्ट्‌स सायबर विभागाने शोधून काढल्या असून आतापर्यंत ४०० गुन्हे नोंद करून १०० हून अधिक जणांवर कारवाई करण्यात आली आहे. फेक पोस्टच्या माध्यमातून अनेकांची आर्थिक फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या, दिशा सालियन प्रकरणाच्या निमित्ताने राज्य सरकार, मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचे षडयंत्र सुरू होते. समाजमाध्यमांवर असंख्य बनावट खाती तयार करून त्याआधारे खोटी, चुकीची, बदनामी करणारे साहित्य हेतुपुरस्सर पसरवले जात होते, असा दावा पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता.

सायबर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हे नोंदवून बनावट खाती हाताळणाऱ्या, बदनामी करणाऱ्यांचा शोध घेण्याचे काम सुरू केले होते. त्या वेळी ८० हजारांहून अधिक बनावट खाती समोर आली. या प्रकरणी मुंबई पोलीस अधिक तपास करीत आहेत.

मोठ्या प्रमाणात बनावट खात्यांचा वापर
कोरोना तसेच विविध गोष्टींबाबतही खोटी माहिती शेअर केली जात हाेती. फसवणुकीसाठी मोठ्या प्रमाणात बनावट खात्यांचा वापर केला जात असल्याचे समाेर आले. नुकताच एंजल प्रिया नावाचा ट्रेंड दिसून आला. यात मुले ही मुलगी असल्याचे भासवून फसवणूक करत असल्याचे सायबर विभागाच्या तपासात समोर आले. अनेक फेक पोस्ट ज्या अकाउंटवरून समाजमाध्यमामध्ये व्हायरल करण्यात आल्या ती खातीही फेक असल्याचे दिसून आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *