जानेवारीत दिल्ली येथे शेवटचे उपोषण! अण्णा हजारे यांचा इशारा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २६ डिसेंबर – शेतीमालाला उत्पादनखर्चाच्या दीडपट हमीभाव मिळावा, केंद्रीय व राज्य कृषी मूल्य आयोगाला स्वयत्तता द्यावी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करावी, या प्रमुख मागण्यांसह इतर शेतकरी हिताच्या मागण्यांसाठी जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दिल्ली येथे शेवटचे उपोषण करणार असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना जाहीर केले. दिल्ली येथे रामलीला मैदान अथवा जंतर मंतर येथे उपोषणाला परवानगी मिळाली नाही तर आपण अटक करवून घेऊ व तुरूंगात उपोषण करु असा इशारा हजारे यांनी यावेळी दिला.

हजारे म्हणाले की, शेतकरी हिताच्या मागण्यांसाठी गेल्या चार वर्षांपासून केंद्र सरकारबरोबर आपला संघर्ष सुरू आहे. सन 2018 मध्ये दिल्ली येथे तर सन 2019 मध्ये राळेगणसिद्धी येथे उपोषण केले. दोन्ही वेळेस पंतप्रधान कार्यालयाने तसेच तत्कालीन कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी लेखी अश्वासने दिली.

राज्याचे तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संरक्षण राज्यमंत्री सुरेश भामरे यांच्या मध्यस्थीनंतर आपण उपोषण स्थगित केले. केंद्र सरकारने आश्वासनांची पूर्तता करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा यासाठी केंद्र सरकार, पंतप्रधान कार्यालय, केंद्रीय कृषिमंत्री यांच्याशी 18 वेळा पत्रव्यवहार केला मात्र दखल घेतली गेली नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या हितासाठी शेवटचे उपोषण करण्याचा निर्णय घेतला असल्याचे हजारे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *