शेतकऱ्यांना दिलासा ; तब्‍बल १०५ दिवसानंतर कांद्यावरील निर्यातबंदी उठणार ;, १ जानेवारीपासून निर्यातीस परवानगी

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २९ डिसेंबर -.तब्‍बल १०५ दिवसानंतर कांद्यावरील निर्यातबंदी उठणार आहे. (Government of India, allows) १ जानेवारी २०२१ (1st January 2021) पासून कांदा निर्यात करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. (export of all varieties of onions) या संबंधीची अधिसूचना केंद्रीय वाणीज्‍य मंत्रालयाने जारी केली आहे. उन्हाळ कांद्याची आवक संपुष्टात येत असताना देशांतर्गत लाल कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाल्याने सर्वसाधारण कांद्याचे भाव हे दोन हजार रुपयांच्या आत आले आहेत. कांदा उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झालेले असताना केंद्र सरकारने तब्बल १०५ दिवसांनंतर निर्यात बंदी हटवण्याचा निर्णय घेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देत, कांदा उत्पादकांना नवीन वर्षाची भेट दिली आहे. याबाबत डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेड चे संचालक अमित यादव यांनी परिपत्रक काढून माहिती दिली आहे.


सप्टेंबर महिन्यापासून कांद्याच्या दरांमध्ये वाढ झाल्याने केंद्र सरकारने तातडीने भाववाढ रोखण्यासाठी हस्तक्षेप करत १४ सप्टेंबर २०२० रोजी कांद्यावर निर्यातबंदी लादली होती. त्यानंतर लासलगाव येथील १० व पिंपळगाव बसवंत येथील १ कांदा व्यापाऱ्यांवर प्राप्तिकर विभागाचे छापे टाकून तपासणी केली होती. त्यानंतर २३ ऑक्टोबर रोजी घाऊक व्यापाऱ्यांना पंचवीस तर किरकोळ व्यापाऱ्यांना दोन टन कांदा साठवणुकीची मर्यादा टाकली. मात्र कांद्याचे बाजार भाव नियंत्रणात येत नसल्याने केंद्र सरकारने तुर्कस्तान, इजिप्त, इराण, अफगाणिस्तान या देशातून कांदा आयात करून भाव नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.

मात्र याचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. सध्या मिळणाऱ्या दरामध्ये कांदा उत्पादकांना झालेला खर्चही निघत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेला होता. १ जानेवारीपासून कांद्यावरील निर्यात बंदी हटणार असल्याने नवीन वर्षांमध्ये शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून भेट मिळाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *