महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २९ डिसेंबर – कृषी कायद्याविरोधात सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज 33 वा दिवस आहे. सरकारने शेतकऱ्यांना चर्चेसाठी 30 डिसेंबर रोजी बोलावले आहे. दुपारी 2 वाजता विज्ञान भवनात ही बैठक होईल. याआधी शेतकऱ्यांना शनिवारी सरकारला पत्र लिहून 29 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता बैठकीसाठी बोलावले होते. या चर्चेसाठी शेतकऱ्यांनी 4 अटी देखील ठेवल्या आहेत.
सरकारशी चर्चा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या 4 अटी
1. तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याच्या संभाव्यतेवर चर्चा केली पाहिजे.
2. मिनिमम सपोर्ट प्राइसची (एमएसपी) कायदेशीर हमी चर्चेच्या अजेंड्यात असावी.
3. वायु गुणवत्ता व्यवस्थापन अध्यादेशाअंतर्गत शिक्षेच्या तरतुदी शेतकऱ्यांना लागू करू नयेत. अध्यादेशात बदल करुन अधिसूचित केले जावे.
4. वीज दुरुस्ती विधेयकातील बदलाच्या मुद्द्यालाही चर्चेच्या अजेंड्यात समाविष्ट केले जावे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी संध्याकाळी सिंघू सीमेवर शेतकऱ्यांची भेट घेतली. एका महिन्यात ते दुसऱ्यांदा सिंघू सीमेवर पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया देखील उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या भेटीनंतर केजरीवाल म्हणाले की, “केंद्र सरकारने शेतकऱ्यांसोबत खुली चर्चा करण्याचे मी आव्हान देतो. या कायद्यामुळे कशाप्रकारे नुकसान होईल ते स्पष्ट होईल.”