महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ३० डिसेंबर – बांगलादेशने ८२५ कोटी रुपये खर्चून २० वर्षांपूर्वीच्या बेटाचे फेरउभारणी केली आहे. येथे सुमारे एक लाख रोहिंग्या स्थलांतरितांच्या मुक्कामाची व्यवस्था करण्यात येत आहे. मानवी हक्क संघटनांच्या आक्षेपानंतरही बांगलादेशच्या नौदलाने मंगळवारी चटगाव बंदरावरून पाच जहाजांद्वारे १७७६ स्थलांतरितांना एकांत बेटावर रवाना केले. एक अधिकारी म्हणाले, हे बेट भूभागापासून ३४ किमीवर आहे. मंगळवारी सायंकाळी रवाना झालेले स्थलांतरित तीन तासांनंतर बेटावर पोहोचले. बेटावर राहण्यासाठी जाण्याची इच्छा असलेल्यांनाच नेण्यात आल्याचा दावाही अधिकाऱ्यांनी केला. परंतु बेटावर जाण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा आरोप मानवी हक्क संघटनांनी केला. बांगलादेशची लोकसंख्या १६.१५ कोटी आहे. शेजारी देश म्यानमारमध्ये हिंसाचार सुरू झाल्यामुळे वर्दळीच्या कॉक्स बाजार जिल्ह्यात १० लाख रोहिंग्या आश्रयाला आहेत. या आधी ४ डिसेंबरला याच बेटावर १,६४२ स्थलांतरितांची रवानगी करण्यात आली होती.
२० वर्षांपासून निर्मनुष्य असलेले बेट मान्सूनच्या पावसात नेहमी बुडून जाते. परंतु बांगलादेशच्या नौदलाने ११.२ कोटी डॉलर (सुमारे ८२५ कोटी रुपये) एवढा खर्च करून बेटावर तटबंदी उभारण्यात आली. घरे, रुग्णालये, मशिदी बांधण्यात आल्या. बेटावर एक लाख लोकांच्या मुक्कामाची तयारी करण्यात आली आहे. या आधी अधिकाऱ्यांनी ४ डिसेंबरला १६४२ रोहिंग्यांना पाठवण्यात आले होते.