महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ३१ डिसेंबर – पश्चिमी विक्षोभ, हिंदी महासागरातील चक्रीवादळ आणि पर्वतांवरील जोरदार हिमवृष्टीमुळे उत्तर आणि मध्य भारत थंडीच्या विळख्यात सापडला आहे. आज पश्चिम आणि उत्तरेकडील भारतात किमान तापमानात ३ ते ५ अंशांची घसरण होऊ शकते, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. वर्षाच्या शेवटच्या दिवशी ऑरेंज, तर नव्या वर्षासाठी हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे. तसेच राजस्थानातील अनेक जिल्ह्यांत कडाक्याच्या थंडीचाही इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे, चुरू, बिकानेर व हनुमानगडमध्ये थंडीचा परिणाम दिसू शकतो.
कच्छ ते सौराष्ट्रापर्यंत थंडीची लाट
आगामी दोन ते तीन दिवस कडाक्याच्या थंडीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. याचा परिणाम उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान आणि गुजरातमधील कच्छ ते सौराष्ट्रापर्यंत जाणवेल. पुढील दोन दिवस राज्यात थंडीची लाट कायम असेल.
४ श्रेणींत देतात इशारा
सामान्य लोकांच्या आयुष्यावर होणारा परिणाम चार श्रेणींमध्ये विभागला जात असतो. ज्यामध्ये ग्रीन, येलो, ऑरेंज आणि रेड अलर्टचा समावेश आहे. रेड अलर्टला सर्वात गंभीर श्रेणीमध्ये ठेवले जाते.