महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १ जानेवारी – आयसीसीने भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान या दोन संघांतील कसोटी सामन्यांचा निकाल लागल्यानंतर वर्षाअखेरीस नवी क्रमवारी जाहीर केली आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनला गेल्या काही सामन्यांत केलेल्या चांगल्या कामगिरीचा फायदा झाला असून स्टिव्ह स्मिथ आणि विराट कोहली यांना मागे टाकून त्याने या यादीत पहिले स्थान पटकावले.
विल्यमसन ८९० गुणांसह पहिल्या स्थानावर असून स्मिथ पहिल्या स्थानावरुन तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. याव्यतिरीक्त दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाकडून शतकी खेळी करणाऱ्या अजिंक्य रहाणेच्या क्रमवारीतही सुधारणा झाली असून तो क्रमवारीत सहाव्या स्थानी पोहचला आहे, तर चेतेश्वर पुजाराच्या क्रमवारीत घसरण झाली असून तो दहाव्या स्थानी पोहचला आहे.