महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. ४ जानेवारी -रेल्वे पोलीस दलातील पोलीस कॉन्स्टेबल सुजीतकुमार निकम यांनी स्वतःचे प्राण धोक्यात घालून दहिसर रेल्वे स्थानकावर एका 60 वर्षीय व्यक्तीचे प्राण वाचवले त्याबद्दल त्यांचा गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते आज सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना पोलीस दलाकडून जेव्हा मानवतावादी कामगिरी त्यांच्या हातून घडते त्यावेळेस पोलिसांच्या कामगिरीचा मला प्रचंड अभिमान वाटतो, असे गौरवोद्गार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काढले.
पोलीस हवालदार संतोष निकम यांनी मोठ्या शिताफीने रुळावर पडलेल्या एका ज्येष्ठ व्यक्तीला मदत केली आणि त्यांचे प्राण वाचविले. या कामगिरीबद्दल मी त्यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. यावेळी पोलीस अधिकारी उपस्थित होते. @MumbaiPolice @CPMumbaiPolice pic.twitter.com/G9qaedjaHA
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) January 3, 2021
‘ज्ञानेश्वरी’ या शासकीय निवासस्थानी पार पडलेल्या या सत्कार सोहळ्यात बोलताना गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीदवाक्याला अनुसरून पोलीस बांधव आपले कर्तव्य बजावत असतात. पोलीस दलातील शिपाईपासून ते वरिष्ठ अधिकाऱयांपर्यंत उत्तम काम करणाऱयां तसेच समाजाप्रति आपला वेगळा ठसा उमटवतात. गृहमंत्री या नात्याने पोलीस बांधवांचे मनोबल वाढवणे, त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस करणे, त्यांच्या सुख दुःखाची दखल घेणे हे आपले कर्तव्य व आपली ती नैतिक जबाबदारी असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.