महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. ४ जानेवारी – तंबूंमध्ये भरलेले पाणी… भिजलेली ब्लँकेट्स अन् भिजलेली जळावू लाकडे…. ही स्थिती होती दिल्लीच्या कडाक्याच्या थंडीत गेल्या महिनाभराहून अधिक कालावधी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करीत असलेल्या शेतकऱ्यांच्या कॅम्पमधली. रविवारी सकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे या आंदोलक शेतकऱ्यांची दैना उडाली. पण, तरीही थंडी-पावसाचा सामना करीत हे शेतकरी निधड्या छातीने दिल्लीच्या सीमा अडवून उभे आहेत.
आमच्याकडे ब्लँकेट्स, कपडे, जळावू लाकडे आदी भिजले आहे. लाकडे भिजल्यामुळे जेवण बनवण्यातही अडचण येत आहे. आमच्याकडे एलपीजी सिलिंडर आहे. मात्र, सर्व शेतकऱ्यांकडे ते नाहीत
वीरपाल सिंह, आंदोलनकर्ते शेतकरी
शेतकऱ्यांकडे वॉटरप्रूफ तंबू आहेत. पण, रविवारपासून सुरू असलेल्या पावसामुळे पाणी तुंबल्याने त्यांच्या तंबूंमध्ये पाणी शिरल्याने, तसेच थंडीमुळे ते आपला बचाव करू शकले नाहीत, असे संयुक्त किसान मोर्चामधील शेतकरी नेते अभिमन्यू कोहर यांनी रविवारी सांगितले. पावसामुळे आंदोलनस्थळी कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे. या ठिकाणी पाणी तुंबले आहे. पावसामुळे थंडी आणखीनच वाढली आहे. परंतु सरकारला याची अजिबात फिकीर नाही. शेतकऱ्यांच्या या अडचणी सरकारला दिसत नाहीत, असेही कोहर म्हणाले.
दिल्लीचा पारा घसरला
दरम्यान, दिल्ली हवामान विभागानुसार, राजधानीतील काही भागांत मुसळधार पाऊस झाला. पाऊस आणि पूर्वेकडील गार वाऱ्यांमुळे तापमानात आणखी कमी झाले आहे. हवामान विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, सफदरजंग वेधशाळेत ९.९ अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची, तसेच २५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर, पालम वेधशाळेत ११.४ अंश सेल्सिअस तापमान आणि १८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सहा जानेवारीपर्यंत पावसाबरोबरच गाराही पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
भारतीय किसान युनियन, उग्रहणचे नेते सुखदेव सिंह यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी टिकरी सीमेवर आंदोलन करीत आहेत. त्यांनी सांगितले की, थंडीपासून शेतकऱ्यांचे रक्षण करण्यासाठी बंदोबस्त करण्यात आला आहे. मात्र, पाऊस आणि पाणी तुंबल्याने हे उपाय तोकडे पडत आहेत. अन्य एक आंदोलनकर्ते शेतकरी वीरपाल सिंह यांनी सांगितले की, त्यांच्याकडी ब्लँकेट्स, कपडे, जळावू लाकडे आदी भिजले आहे. लाकडे भिजल्यामुळे जेवण बनवण्यातही अडचण येत आहे. आमच्याकडे एलपीजी सिलिंडर आहे. मात्र, सर्व शेतकऱ्यांकडे ते नाही. तर, गाजीपूर सीमेवर आंदोलन करीत असलेले शेतकरी धर्मवीर यादव म्हणाले की, अगदी वादळ आले, कितीही अडचणी आल्या, तरी आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही.