महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. ५ जानेवारी – एकीकडे देश कोरोना विषाणूशी झुंज देत आहे, तर दुसरीकडे पंजाब-हरियाणातील शेतकरी कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या 40 दिवसांपासून राजधानी दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत. सध्या उत्तर भारतात खूप थंडी आहे, तसेच दोन दिवसांपासून दिल्लीसह आसपासच्या परिसरात अवकाळी पाऊसही सुरुच आहे. अशा परिस्थितीत पाऊस आणि थंडीची चिंता न करता शेतकऱ्यांनी त्यांचं आंदोलन सुरुच ठेवलं आहे.
कोणत्याही नैसर्गिक आपत्तीचा शेतकऱ्यांच्या आंदोलनावर परिणाम झालेला नाही. यावेळी, शेतकर्यांच्या आंदोलनाची काही छायाचित्रे समोर आली आहेत, जी लोकांच्या हृदयाला स्पर्श करत आहेत.
दिल्ली, सिंघू बॉर्डर, टिकारी बॉर्डर आणि गाजीपूर बॉर्डरवर शेतकरी आंदोलन करत आहेत. उत्तर भारतात भयानक थंडी तर आहेच, सोबत अवकाळी पाऊसही सुरु आहे. परंतु या आपत्तींमुळे शेतकरी मागे हटले नाहीत. उलट त्यांनी त्यांचा लढा अधिक तीव्र केला आहे. आपत्ती उग्र रुप धारण करत असताना शेतकरी मागे हटण्याचं नाव घेत नाही.
हवामान खात्याचे म्हणणे आहे की, “शुक्रवारी दिल्लीत थंडीने गेल्या 15 वर्षांचा विक्रम मोडला आहे”. इतक्या थंडीतही शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु ठेवले आहे.