दिलासा दायक बातमी ; ‘त्या’ आठ बाधितांना कोणतीही लक्षणे नाहीत

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. ६ जानेवारी – पुणे: ब्रिटन येथून आलेल्या प्रवाशांपैकी नव्या करोना विषाणूचा संसर्ग झालेल्या राज्यातील आठ जणांना कोणतीही लक्षणे नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याशिवाय मुंबईत असलेल्या यातील पाच रुग्णांपैकी दोन जण हे गोवा आणि गुजरात राज्यातील असल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली आहे. दरम्यान, राज्यात आज नव्या विषाणूचा एकही रुग्ण आढळला नसून हा खूप मोठा दिलासा ठरला आहे.

राज्यात ब्रिटनहून आलेल्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. या पार्श्वभूमीवर त्यांचा शोध घेऊन त्यांच्या करोना चाचण्या करण्यात येत आहेत. तसेच त्यांचे नमुने जनुकीय रचनेचा शोध घेण्यासाठी राष्ट्रीय विषाणू संस्था (एनआयव्ही) येथे पाठविण्यात येत आहेत. राज्यातील आठ जणांना नव्या विषाणूचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत राज्याचे रोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी आज महत्त्वाची माहिती दिली.

डॉ. प्रदीप आवटे म्हणाले, ‘राज्यात आठ जणांना नव्या विषाणूचा संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. त्यापैकी पाच रुग्ण मुंबईतील होते. त्या पाचमध्ये गोवा आणि गुजरात येथील प्रत्येकी एक रुग्ण असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे ब्रिटनहून परतलेल्यांपैकी करोनाचा संसर्ग झालेल्या एकूण रुग्णांची राज्यातील संख्या ७२ नसून ७० म्हणून नोंद केली आहे. त्याशिवाय नव्या विषाणूची लागण झालेल्या रुग्णांना कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. ते लक्षणे विरहित असून त्यातील पुण्यासह मुंबईतील प्रत्येकी एक अशा दोघांची चौदाव्या दिवशी चाचणी केल्यानंतर त्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे.’

दरम्यान, ब्रिटनहून तूर्त विमानसेवा बंद असली तरी त्याआधी गेल्या दोन महिन्यांत भारतात आलेल्या सर्वच प्रवाशांसाठी नियमावली निश्चित करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रात अशा सर्व प्रवाशांना विलगीकरणात ठेवण्याचे ठरवण्यात आले आहे. त्यानुसार आतापर्यंत ४ हजार ८४९ प्रवाशांचा शोध लागला असून त्यातील ३ हजार ४१७ प्रवाशांच्या आरटी-पीसीआर चाचण्या आतापर्यंत पूर्ण करण्यात आल्या आहेत. त्यातील ७० प्रवाशांचे अहवाल करोनासाठी पॉझिटिव्ह आले असून त्यात मुंबईतील २८, पुण्यातील १४, ठाण्यातील ८, नागपूरमधील ९, नाशिक, औरंगाबाद, रायगड आणि बुलडाण्यातील प्रत्येकी दोन, उस्मानाबाद, नांदेड आणि वाशिम येथील प्रत्येकी एका प्रवाशांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *