महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. ६ जानेवारी – कोरोना महामारी दरम्यान देशातील अनेक राज्यांत बर्ड फ्लूचाही धोका वाढला आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि केरळमध्ये बर्ड फ्लूचा कहर सुरुच आहे. या राज्यांत शेकडो पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे.
केरळमध्ये आतापर्यंत १७०० बदकांचा मृत्यू झाला आहे. राज्यस्थानच्या झालावाड, कोटासह १६ जिल्ह्यांत आतापर्यंत ६२५ पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशातील मंदसौरमध्ये सुमारे १००, इंदोरमध्ये १४२, मालवा ११२ आणि खरगोन जिल्ह्यात १३ कावळ्यांचा मृत्यू झाला आहे. तर हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्याच्या पौंग सरोवर अभयारण्यातील २७३९ स्थलांतरित आणि स्थानिक पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर हिमाचल प्रदेशात कोंबड्या, बदक आणि अंड्यांच्या विक्रीवर निर्बंध घातले आहेत.
गुजरातमध्ये बर्ड फ्लूचा फैलाव होत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. येथील जुनागढ जिल्ह्यातील खारो जलाशयात सुमारे ५३ पक्षी मृतावस्थेत आढळून आलेत.
राजस्थानच्या विविध जिल्ह्यात बर्ड फ्लूचा धोका वाढत चालला आहे. येथील पक्ष्यांच्या मृतांचा आकडा ६२५ वर पोहोचला आहे. कावळे आणि अन्य काही पक्षी मृत आढळल्यानंतर आता राष्ट्रीय पक्षी मोर देखील मोठ्या प्रमाणात मृतावस्थेत आढळून आलेत. दौसा जिल्ह्यातील बसवा भागात ५ मोरांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी बर्ड फ्लूमुळे पक्ष्यांच्या मृत्यूंच्या घटनांकडे गंभीरपणे लक्ष देण्याचे निर्देश दिले आहेत. कोणत्याही पक्षाचा मृत्यू झाल्यास त्यांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवून देण्याची सूचना प्रशासनाला केली आहे.
दौसामध्ये पक्ष्यांच्या मृत्यूचे सत्र सुरुच आहे. दौसा जिल्ह्यातील बसवी तहसीलमधील चौबडीगाव गावात पोहोचलेल्या वन विभागाच्या टीमने ५ मृत मोरांना ताब्यात घेतले. घटनास्थळी पीपीई किट घालून मृत पक्ष्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
केरळमध्ये बर्ड फ्लूचा मोठ्या प्रमाणात फैलाव होत आहे. या फैलावाच्या पार्श्वभूमीवर राज्यस्तरीय आपत्तीची घोषणाही करण्यात आली आहे. कोरोनानंतर आता या नव्या संकटाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून वेळीच खबरदारीचे उपाय केले आहेत. (Bird flu is declared as state specific disaster in Kerala and high alert has been issued)