संक्रांतीपासून देशात लसीकरणाची सुरुवात होण्याची शक्यता

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. ६ जानेवारी -१४ जानेवारी म्हणजे मकर संक्रांतीपासून दिवस मोठा होऊ लागतो. त्याच सुमारास भारतात कोरोनाविरुद्ध सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेची सुरुवात होण्याची शक्यता आहे. केंद्राने म्हटले आहे की, लसींना मंजुरी मिळाल्यानंतर १० दिवसांच्या आत लसीकरण सुरू होईल. औषधे महानियंत्रकांनी ३ जानेवारीला देशात ‘कोविशील्ड’ आणि ‘कोव्हॅक्सिन’ या लसींच्या आपत्कालीन वापरास मंजुरी दिली होती.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले की, लसीकरणाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. सर्वात आधी लस कंपन्या कर्नाल, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता येथील शासकीय वैद्यकीय पुरवठा डेपोत लस पोहोचवतील. तेथून लस राज्यांच्या राजधान्यांमध्ये पोहोचेल. नंतर ती जिल्हा मुख्यालय, कम्युनिटी हेल्थ सेंटर, प्राथमिक आरोग्य केंद्रांपर्यंत नेण्याची जबाबदारी राज्य सरकारांची असेल.

सध्या ३ कोटी कर्मचाऱ्यांना मोफत लस : देशात फेब्रुवारीपर्यंत १ कोटी आरोग्य कर्मचारी आणि २ कोटी आघाडीच्या कर्मचाऱ्यांना लस मोफत दिली जाईल. देशभरात २७ कोटी ज्येष्ठ नागरिकांनाही प्राधान्याने लस दिली जाईल. सरकार सध्या लस कंपन्यांकडून खरेदी करण्यासाठी कराराच्या अटी निश्चित करत आहे.

कोणत्या आजाराच्या रुग्णांना आधी लस, हे समितीच निश्चित करणार
ज्या लोकांचे वय ५० वर्षांपेक्षा कमी आहे आणि त्यांना कुठला गंभीर आजार आहे, याची ओळख पटवली जाईल. त्यासाठी केंद्र सरकारने तज्ज्ञांची उच्चस्तरीय समिती बनवली आहे. कोविड टास्क फोर्सचे प्रमुख प्रा. व्ही. के. पॉल यांनी सांगितले की, कोणत्या आजारांमुळे जिवाला धोका आहे, हे समिती निश्चित करेल. समिती दोन दिवसांत अहवाल देईल. सूत्रांच्या मते, मूत्रपिंड, यकृताशी संबंधित आजार, मधुमेह, हृदयरोग असणाऱ्या लोकांना आधी लस दिली जाईल. अशा लोकांना लस घेण्याआधी डॉक्टरांकडून विशेष प्रपत्र तयार करून घ्यावे लागेल, अशी शक्यता आहे.

लस निर्मात्यांमधील वाद संपला; आता एकत्र काम करण्याची ग्वाही
सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या लस निर्मात्यांमधील संघर्ष संपला आहे. दोन्ही संस्थांनी मंगळवारी संयुक्त निवेदन जारी केले. त्यात म्हटले आहे की, देशात लस पोहोचवण्यासाठी एकत्र येऊन काम करू. सोमवारी सीरमचे प्रमुख अदर पूनावाला यांनी म्हटले होते की,‘फक्त फायझर, मॉडर्ना आणि ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेका यांची लस प्रभावी आहे. इतर सर्व पाणी आहे.’ त्यावर भारत बायोटेकचे अध्यक्ष कृष्णा एल्ला यांनी म्हटले होते की,‘ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनेका लसीच्या चाचणीदरम्यान स्वयंसेवकांवरील साइड इफेक्ट लपवण्यासाठी औषधे देण्यात आली होती.’

राज्यांची तयारी : लसीकरण केंद्रे सज्ज, आता फक्त प्रतीक्षा
महाराष्ट्र : ४,२०० लसीकरण केंद्रे. पहिल्या टप्प्यात १२ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देणार. ७.५ लाख जणांची नावनोंदणी मप्र : ५ लाख आघाडीवरील कर्मचाऱ्यांना लस देणार. दीड कोटी लोकांना लस देण्यासाठी १० हजार केंद्रे स्थापन करणार. गुजरात : ४० हजार केंद्रांत रोज १६ लाख लोकांना लस देणार. जुलैपर्यंत १.२३ कोटी लोकांना लस देण्याची तयारी. पंजाब : १.६ लाख आरोग्य कर्मचाऱ्यांसह १.२५ कोटी लोकांना लस दिली जाईल. ११ हजार केंद्रे तयार केली आहेत. राजस्थान : आरोग्य विभाग कर्मचाऱ्यांसह १० लाख जणांना लस. जुलैपर्यंत १.६५ कोटी लोकांना २४०० केंद्रांवर लस. यूपी : तीन टप्प्यांत ३.५ कोटी लोकांना लस दिली जाईल. त्यासाठी ३ हजार लसीकरण केंद्रे स्थापन केली जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *