महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ७ जानेवारी – हृदयविकाराचा सौम्य धक्का बसल्यानंतर हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या बीसीसीआयचे अध्यक्ष व माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलींना आज वुडलँडस हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. गांगुलींची घरवापसी झाल्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
व्यायाम करताना २ जानेवारी रोजी सौम्य हृदयविकाराचा धक्का बसल्याने सौरव गांगुलींना कोलकाताच्या वुडलँडस हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तसे प्रसिद्धिपत्र वुडलँड हॉस्पिटल प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आल्यानंतर सर्वांना याची माहिती मिळाली होती.यानंतर त्यांच्यावर त्वरित अँजिओप्लास्टी करण्यात आली. आज गांगुलींना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला.
यावेळी माध्यमांशी प्रथमच बोलताना गांगुली म्हणाले की, “लवकरच मी पुन्हा नव्याने कामास सुरुवात करीन. घडलेला प्रसंग हा आयुष्याचाच एक भाग आहे. सध्या माझी प्रकृती ठीक असली तरी येत्या काही दिवसात डॉक्टरांच्या सल्ल्याने मी कामाला सुरुवात करणार आहे. ”
९ डॉक्टरांचे पथक गांगुलींवर उपचार करीत होती. या पथकाने गांगुली वैद्यकीयदृष्ट्या फिट असल्याचे सांगितले आहे.