आधीच बनावट ऍप्सचा सुळसुळाट ; अधिकृत कोविन मोबाईल ऍप अजून यायचे आहे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ९ जानेवारी – कोरोना व्हायरसच्या संकटकाळात संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले होते ते कोरोनावरच्या इलाजाकडे. भारताने देखील जनतेसाठीच्या लसीकरणाला मान्यता दिली आणि मग या लसीकरणाच्या मोहिमेसाठी अनेक पातळ्यांवरती लगबग सुरू झाली. यातलाच एक भाग म्हणून लसीकरणाच्या मोहिमेत सुसूत्रता यावी, नागरिकांची माहिती व्यवस्थित गोळा करता यावी आणि मुख्य म्हणजे नागरिकांना या लसीकरणासाठी घरबसल्या नोंदणी करता यावी यासाठी केंद्र सरकारने ‘कोविन मोबाईल ऍप’ या अधिकृत मोबाईल ऍप्लिकेशनची नुकतीच घोषणा केली आहे.

चिंतेची गोष्ट म्हणजे, हे मोबाईल ऍप अजून दाखल व्हायच्या आधीच या ऍपच्या नावाशी साधर्म्य दाखवणाऱ्य़ा अनेक बोगस मोबाईल ऍप्सचा बाजारात सुळसुळाट झाला आहे. यातील अनेक ऍप्लिकेशन्स ही अत्यंत घातक असून युजर्सचा महत्त्वाचा डाटा चोरणे, मोबाईलमध्ये मालवेअर इन्स्टॉल करणे अशी धोकादायक कामे करणारी आहेत. अनेक नागरिकांना याबद्दल नीट माहिती मिळालेली नसल्याने हे नागरिक अशा बनावट ऍप्सच्या जाळ्यात फसत चालले आहेत.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे ‘गुगल प्ले’ स्टोअरसारख्या लोकप्रिय अशा ऍप स्टोअरमध्येदेखील चक्क ‘कोविन’ नावाचेच एक मोबाईल ऍप डाऊनलोडसाठी उपलब्ध आहे आणि दहा हजारांपेक्षा जास्ती नागरिकांनी त्याला डाऊनलोडदेखील केलेले आहे. हे कोणतेही अधिकृत सरकारी मोबाईल ऍप्लिकेशन नसून याचा लसीकरणाच्या नोंदणीसाठीदेखील कोणताही उपयोग नाही.

हे ऍप केवळ सहजपणे नेटवरती उपलब्ध असणारी देशातील कोरोना रुग्णांची संख्या, चालू केसेस, मृतांचा आकडा अशी माहितीच उपलब्ध करून देते आहे. नागरिकांनी अशा बनावट ऍपपासून सावध राहण्याची अत्यंत गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *