महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ९ जानेवारी – टीम इंडियाचा माजी कप्तान महेंद्रसिंग धोनी उर्फ माही याने गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली असली तरी तो आयपीएल चेन्नई संघाचा कप्तान राहणार आहे. टी २० लीगच्या १४ व्या सिझन मध्ये तो चेन्नई साठी कप्तानी करेलच पण एक खास कामगिरीही करणार आहे. आयपीएलच्या पुढच्या सिझन मध्ये उतरण्याबरोबर माही आयपीएल मध्ये १५० कोटींची कमाई करणारा पाहिला आणि एकमेव खेळाडू ठरणार आहे. माहीने आयपीएल मधून आत्तापर्यंत १३७ कोटींची कमाई केली आहे. अन्य खेळाडूंच्या तुलनेत ही कमाई खुपच अधिक आहे.
आयपीएलच्या पहिल्या सिझन मध्ये माही सर्वात महाग खेळाडू होता. पुढच्या तीन सिझनसाठी त्याने १८ कोटींची कमाई केली होती. त्यानंतर बीसीसीआयने रिटेंशन किंमत वाढविण्याचा निर्णय घेतला. परिणामी माहीची पुढील तीन वर्षांची कमाई वर्षाला ८.२८ कोटींनी वाढली होती. २०१४-१५ मध्ये त्याची कमाई १२.५ कोटी होती. रायझिंग सुपरस्टार कडून खेळताना त्याने पुढील दोन वर्षात २५ कोटींची कमाई केली. २०१८ मध्ये पुन्हा एकदा बीसीसीआयने रिटेंशन किंमत वाढविल्यामुळे माहीची कमाई वर्षाला १५ कोटींवर गेली आहे.
यामुळे पुढची दोन वर्षे माहीने एकूण ४५ कोटींची कमाई केली आहे. २०२१ मध्ये मोठा लिलाव होण्याची शक्यता धुसर असली तरी माही १५ कोटींची कमाई करेलच आणि त्याची एकूण कमाई १५० कोटींवर जाईल असे समजते. पाच वेळा अजिंक्य राहिलेल्या मुंबईच्या रोहित शर्माची कमाई १३१ कोटी आहे तर विराट कोहालीची कमाई १२६ कोटी आहे असे समजते.