महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. १० जानेवारी – मार्नस लाबुशेन आणि स्टिव्ह स्मिथ यांच्या चिवट फलंदाजीच्या जोरावर तिसऱ्या सिडनी कसोटी सामन्यावर कांगारुंनी आपलं वर्चस्व राखलं आहे. चौथ्या दिवशीच्या टी ब्रेक पर्यंत ऑस्ट्रेलियाकडे ४०६ धावांची आघाडी आहे. दुसऱ्या डावांत ऑस्ट्रेलियानं सहा गड्यांच्या मोबदल्यात ३१२ धावा केल्या आहेत. पेन ३९ खेळत आहे आणि कॅमरुन ग्रीन ८३ धावांवर ब्रेक पूर्वी बुमराह चा शिकार झाला .
पहिल्या डावात फलंदाजी करताना रविंद्र जाडेजा आणि ऋषभ पंत जखमी झाले होते. त्यामुळे दुसऱ्या डावात क्षेत्ररक्षणाला दोघेही आले नाहीत. पहिल्या डावात जाडेजानं चार बळी घेतले होते. जाडेजा गोलंदाजी करण्यासाठी नसल्यामुळे त्याचा अतिरिक्त भार इतर गोलंदाजावर पडल्याचं दिसलं. तसेच चौथ्या दिवशी भारतीय संघानं दोन झेल सोडल्याचा फटकाही बसल्याचं दिसलं. स्मिथ-लाबुशेन यांनी लागोपाठ दुसऱ्यांदा १०० पेक्षा जास्त धावांची भागिदारी केली. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावाचं हेच वैशिष्ट्य ठरलं आहे.
स्मिथनं लागोपाठ दुसऱ्या डावात ५० पेक्षा जास्त धावा चोपल्या आहेत. बॉर्डर-गावसकर मालिकेत दोन्ही डावांत ५० पेक्षा जास्त धावा काढण्याची स्मिथची ही तिसरी वेळ आहे. सचिन आणि पाँटिंग यांनी प्रत्येकी ४-४ वेळा दोन्ही डावात ५० पेक्षा जास्त धावा चोपल्या आहेत.