दहा दिवसांत राज्यातील सर्व महाविद्यालये सुरू करण्याबाबतचा निर्णय होणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. १० जानेवारी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महाविद्यालये अद्याप बंद आहेत. ऑनलाइन पद्धतीने शिक्षण आणि परीक्षा होत असल्या तरी प्रत्यक्षात महाविद्यालये सुरू होण्याबद्दल संभ्रम कायम आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या आरोग्याची आणि सुरक्षिततेची खबरदारी घेऊन ५० टक्के विद्यार्थी उपस्थितीमध्ये महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून २० जानेवारीपर्यंत घेतला जाईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. शनिवारी फेसबुक लाइव्हद्वारे त्यांनी विद्यार्थी, प्राचार्य, प्राध्यापक यांच्याशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते.

उदय सामंत यांनी या फेसबुक लाइव्हद्वारे महाविद्यालये सुरू करणे, प्राध्यापक भरती, महाविद्यालयांचे प्रश्न, प्रवेश प्रक्रियेतील अडथळे आदी विषयांवर विद्यार्थी, प्राचार्य, प्राध्यापक यांच्याशी संवाद साधला. ५० टक्के उपस्थितीत महाविद्यालये सुरू करण्यास विद्यापीठातील वसतिगृहे, महाविद्यालयांची परिस्थिती, क्वारंटाईन सेंटर म्हणून वापरात आणलेल्या शैक्षणिक संस्था यांचा आढावा घेऊन, येत्या १० दिवसांत सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती दिली.

तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची जिल्हास्तरीय, परराज्यात व सीमा भागात केंद्रे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यादृष्टीने चर्चा व प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. गोंडवाना विद्यापीठात अत्याधुनिक डेटा सेंटर उभारण्याला परवानगी, गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात मॉडेल कॉलेज उभारण्याचा निर्णय यांचाही त्यांनी फेसबुक लाइव्हदरम्यान उल्लेख केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *