महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. १० जानेवारी – भंडारा येथील जिल्हा रुग्णालयातील दुर्घटनेत दहा बालके दगावल्याने अतिशय वेदना होत आहेत. अशा प्रकारची घटना पुढे घडू नये, यासाठी राज्यातील हॉस्पिटलमध्ये जिथे नवजात बालकांना ठेवले जाते, त्या (शिशू केअर युनिट) कक्षांचेही फायर ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी दिली.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) वार्षिक सभेनंतर ते शनिवारी पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले, आरोग्यमंत्री राजेश टोपे हे पुण्याला सभेसाठी येणार होते. त्यांना मी भंडारा येथे पाठविले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली आहे. घटना कळाल्यापासून ते प्रशासनाच्या संपर्कात आहेत. संबंधितांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आलेली आहे. तिथे सतत 24 तास ऑनड्युटी कोणीतरी थांबायला हवे होते. रात्री कोणाची ड्युटी होती, कोणाची जबाबदारी होती, हे तपासले जाईल. यामध्ये जो कोणी दोषी असेल त्याला कडक शासन केले जाईल. त्यामध्ये कोणाचाही मुलाहिजा ठेवला जाणार नाही.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी भंडारा येथील घटनेच्या ठिकाणी अग्निशमन यंत्रणा नव्हती आणि आठ दिवसांपूर्वी रुग्णालय प्रशासनाच्या निदर्शनास ही बाब आणल्याचे वक्तव्य केल्याबदल छेडले असता ते म्हणाले की, घडलेली घटना दुर्दैवी आहे. कोणी काय वक्तव्य करावेे, हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. ऑडिट अहवाल आल्याशिवाय त्या गोष्टी कशामुळे घडल्या याबद्दल बोलणे योग्य ठरणार नाही. जे कोणी वक्तव्य करीत आहेत, त्या गोष्टींमध्ये तथ्य आहे का, हे तपासणीवेळी पाहिले जाईल.