विजयाच्या आशा पल्लवीत ; दुखापतीनंतरही पंतनी कांगारुं गोलंदाजांना अक्षरशः तुडवल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ११ जानेवारी -यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने पुन्हा एकदा आपल्या तुफानी फलंदाजीनं सर्वांच मनं जिंकली आहेत. दुखापतीनंतरही मैदानावर येत पंतनं आपल्या शैलीत फटकेबाजी केली. पहिल्या डावात फलंदाजीदरम्यान ऋषभ पंतला दुखापत झाली होती. त्यामुळे दुसऱ्या डावात यष्टीरक्षणासाठीही पंत मैदानावर उतरला नव्हता. मात्र, दुसऱ्या डावात ४०७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ अडचणीत सापडल्यानंतर पंत पुन्हा एखाद्या संकटमोचकाप्रमाणे मैदानावर उतरला.

पाचव्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे बाद झाल्यानंतर भारतीय संघ अडचणीत आणि दबावात सापडला होता. मात्र, ऋषभ पंतनं आपल्या तुफानी शैलीत फटकेबाजी करत कांगारुंवर दबाव निर्माण केला. पंतच्या तुफानी फटकेबाजीमुळे भारतीय संघाच्या विजयाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

पंत आणि पुजारा यांनी केलेल्या शतकी भागिदारीच्या बळावर भारत विजयाकडे आगेकूच करत आहे. भारतीय संघाला विजयासाठी २०० पेक्षा कमी धावा करायच्या आहेत. ऋषभ पंतनं १२ चौकार आणि तीन षटकराच्या मदतीनं ९७ धावांची खेळी केली आहे. चेतेश्वर पुजारा १२ चौकारासह ७७ धावांवर बाद झाला आहे. भारतीय संघाच्या विजयाच्या आशा आता विहारी आणि अश्विन वर आहे.

पंतनं दुखापतीनंतर मैदानात उतरत भारतीय संघावरील दबाव कमी केला. त्याच्या या धाकडपणामुळे सोशल मीडियात कौतुकाचा वर्षाव होत आहे. पंत एखाद्या संकटमोचकाप्रमाणे भारतासाठी धावून आला. ऋषभ पंतनं कसोटी वाचवण्याऐवजी धावा करण्याच्या उद्देशाने खेळ केल्यामुळे सामना रंगतदार अवस्थेत येऊन पोहोचला आहे. दुखापतीमुळे सामन्याबाहेर गेलेला रवींद्र जडेजा, सुमार कामगिरी करणारा हनुमा विहारी इत्यादी बाबी भारताच्या विरोधात असल्याने आता अखेरच्या सत्रात विहारी कशाप्रकारे खेळतोय, यावरच या सामन्याचे भवितव्य अवलंबून आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *