महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १२ जानेवारी -करोना प्रतिबंधक लसीकरणाचा कार्यक्रम १६ जानेवारीपासून सुरु होणार असून कोरोना योद्ध्यांना विनामुल्य लस दिली जाणार आहे. त्यासाठी केंद्र सरकार तीन कोटी लसी विकत घेणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदी यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडली. या बैठकीत कोरोना लसीकरणाबाबत त्यांनी महत्वपूर्ण घोषणा केल्या.
मोदी म्हणाले, कोविडच्या बिकट परिस्थितीत आपण एकमेकांसोबत काम करत आहोत, याबाबत मी समाधानी आहे. सर्व राज्यांनी संवेदनशील पद्धतीने तातडीने निर्णय घेतले. त्याचाच परिणाम म्हणून जगात जितक्या मोठ्या प्रमाणावर करोनाचा फैलाव झाला तितक्या प्रमाणात तो भारतात झाला नाही. १६ जानेवारीपासून भारतात जगातील सर्वात मोठा लसीकरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. दोन मेड इन इंडिया लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे.
सर्व राज्यातील आरोग्य कर्मचारी आणि कोविड योद्ध्यांची संख्या पाहिली तर ती सुमारे ३ कोटी इतकी आहे. हे निश्चित झालं आहे की, या पहिल्या टप्प्यातील ३ कोटी लोकांच्या लसीकरणासाठी राज्यांना कोणताही खर्च करावा लागणार नाही. भारत सरकार हा खर्च करणार आहे, असेही मोदी यावेळी म्हणाले.
या लसीकरण मोहिमेत सर्वात महत्वाची बाब म्हणजे ज्यांनी लस घेतली आहे, त्यांची ओळख पटवणं आणि त्यांच्यावर लक्ष ठेवणं हे आहे. यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना को-विन नावाचा एक डिजिटल प्लॅटफॉर्मही बनवण्यात आला आहे. त्याचबरोबर आधारच्या मदतीने लाभार्थ्यांची ओळख पटवली जाईल. त्याचबरोबर त्यांना दुसरा डोस वेळेवर मिळावा हे देखील निश्चित केलं जाईल. माझं सर्वांना आवाहन आहे की यासंदभार्तील रिअल टाईम डेटा को-विन वर अपलोड व्हायला हवा. यातील जराशीही चूक या मोहिमेला अपयशी करु शकते, असं मोदी यावेळी म्हणाले.
करोना प्रतिबंधक लस खरेदीसाठी सरकारने अखेर सीरम इन्स्टिटयूट आॅफ इंडियाला आॅर्डर दिली आहे. सरकार सीरमकडून कोव्हिशिल्ड लसीचे एक कोटी १० लाख डोस खरेदी करणार आहे. जीएसटीसह लसीच्या प्रत्येक डोसची किंमत २१० रुपये असेल. या पार्श्वभूमीवर कोरोनाची लस तयार होत असलेल्या पुण्यात लसीच्या वाहतुकीसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. सीरम कंपनीतून देशाच्या इतर भागांत लसीची वाहतूक करण्याचे काम कुल एक्स कोल्ड चेन लिमिटेड या कंपनीला देण्यात आले आहे.
सर्वात आधी कोणाला मिळणार लस?
सरकारी आणि खासगी आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, कोविडशी आघाडीवर लढणारे इतर कर्मचारी, संरक्षण दलं, पोलीस आणि इतर निमलष्करी दलं यांचे पहिल्या टप्प्यामध्ये लसीकरण केलं जाणार आहे. या पहिल्या टप्प्यामध्ये सुमारे ३ कोटी कर्मचा-यांना लस दिली जाणार आहे.
दुस-या टप्प्यात ५० वर्षांवरील आणि ५० वर्षांखालील रुग्णांना लस दिली जाईल.
३० कोटी लोकांना लस देण्याचं उद्दीष्ट