![]()
✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | 📅 दिनांक : १८ डिसेंबर २०२५ | सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाच्या स्वागतासाठी सगळेच सज्ज झाले आहेत. नवीन कॅलेंडर हातात आलं की, नोकरदार वर्ग सर्वात आधी ‘सुट्ट्या किती आणि कधी?’ हेच पाहतो. फिरायचं प्लॅनिंग, कुटुंबासोबत वेळ, लाँग वीकएंड—या सगळ्याच अपेक्षा नव्या वर्षात मात्र पुरत्या फोल ठरण्याची चिन्हं आहेत. कारण अनेक मोठे सण एकाच दिवशी, तर काही थेट रविवारी आल्याने सुट्ट्यांचं गणित पुरतं बिघडणार आहे.
नवीन वर्षात महाशिवरात्र आणि लक्ष्मीपूजन हे दोन्ही सण रविवारी आल्यामुळे नोकरदारांना त्याचा थेट फटका बसणार आहे. याशिवाय महाराष्ट्र दिन आणि बुद्ध पौर्णिमा १ मे रोजी एकाच दिवशी, तर स्वातंत्र्य दिन आणि पारशी नववर्ष १५ ऑगस्ट रोजी एकत्र आल्याने ‘एक सण = एक सुट्टी’ एवढाच हिशेब उरणार आहे. त्यामुळे सलग सुट्ट्यांचं स्वप्न यंदा अनेकांसाठी अपूर्ण राहणार आहे.
दरम्यान, नव्या वर्षाबाबत पंचांगकर्ते व खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या वर्षात एकूण चार ग्रहणे होणार आहेत. १७ फेब्रुवारीला कंकणाकृती सूर्यग्रहण, ३ मार्चला खग्रास चंद्रग्रहण, १२ ऑगस्टला खग्रास सूर्यग्रहण आणि २८ ऑगस्टला खंडग्रास चंद्रग्रहण होणार आहे. यापैकी ३ मार्चचं चंद्रग्रहण भारतातून दिसणार आहे. ३१ मे रोजी ‘ब्ल्यू मून’चा योग असून, २४ डिसेंबरला सुपरमूनचे दर्शन होणार आहे.
नवीन वर्षात अधिक मास असल्यामुळे सणही उशिरा येणार आहेत. चैत्र शुक्ल प्रतिपदा क्षय तिथीमुळे गुढीपाडवा १९ मार्च रोजी सकाळी ६.५३ नंतर साजरा करावा लागणार आहे. हरितालिका आणि गणेश चतुर्थी १४ सप्टेंबरला एकाच दिवशी, तर दिवाळीत नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन ८ नोव्हेंबरला एकत्र येत आहेत. १७ मे ते १५ जून हा ज्येष्ठ अधिक मास असणार असल्याने सणांची पुढे ढकलण होणार आहे.
विवाहेच्छुकांसाठीही ही बातमी फारशी दिलासादायक नाही. अधिक मास, गुरू-शुक्र अस्त, चातुर्मास आणि सिंहस्थ यामुळे शुद्ध विवाह मुहूर्त अत्यंत कमी आहेत. जानेवारी, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर—या महिन्यांत एकही शुद्ध विवाह मुहूर्त नाही.
थोडक्यात, नव्या वर्षात आकाशात ग्रह-ताऱ्यांची गर्दी असली, तरी नोकरदारांच्या कॅलेंडरमधल्या सुट्ट्या मात्र कमीच असणार आहेत. त्यामुळे २०२६ मध्ये फिरायचं प्लॅनिंग करायचं असेल, तर सुट्ट्यांपेक्षा रजेवरच जास्त भर द्यावा लागणार, हे मात्र नक्की!
