✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | 📅 दिनांक : १८ डिसेंबर २०२५ | राज्याच्या राजकारणात सध्या ‘विकेट पडतेय, पुढची कोणाची?’ अशीच चर्चा रंगली आहे. माणिकराव कोकाटेंकडील क्रीडा खातं काढून घेतल्यानंतर ते बिनखात्याचे मंत्री झाले आहेत. सदनिका वाटप गैरव्यवहार प्रकरणात न्यायालयाकडून दोन वर्षांची शिक्षा, अटक वॉरंट आणि आमदारकी धोक्यात—या सगळ्या कारणांमुळे कोकाटेंची खुर्ची हलली. मात्र, या प्रकरणावरून आता राजकीय वाद आणखी चिघळताना दिसत असून, शरद पवार गटाने थेट ‘पुढची विकेट’ कोणाची, याचं नावच जाहीर केलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांना पत्र लिहून कोकाटेंकडील खातं काढून घेण्याची शिफारस केली होती. राज्यपालांनी ती मान्य केल्यानंतर कोकाटेंकडील क्रीडा खातं उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे सोपवण्यात आलं. विशेष म्हणजे, कोकाटेंचा थेट राजीनामा घेतलेला नसला, तरी त्यांना खात्यापासून दूर करण्यात आलं आहे. सदनिका वाटप प्रकरणात १९९५ सालच्या गैरव्यवहाराबाबत नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने कोकाटेंना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. ही शिक्षा कायम राहिल्यामुळेच राजकीय हालचालींना वेग आला.
कोकाटेंनी हायकोर्टात धाव घेतली असली, तरी तातडीच्या सुनावणीला नकार मिळाल्याने अटक होण्याची शक्यता कायम आहे. त्यामुळेच सरकारने ‘डॅमेज कंट्रोल’ करत खातं काढून घेतल्याचं बोललं जात आहे. धनंजय मुंडेंनंतर वादग्रस्त प्रकरणामुळे खातं गमावणारे कोकाटे हे दुसरे मंत्री ठरले आहेत.
या सगळ्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी एक्स (ट्विटर)वरून सरकारवर जोरदार टीका केली आहे. “न्यायालयाने शिक्षा ठोठावल्यावर नैतिकतेच्या आधारावर तेव्हाच राजीनामा द्यायला हवा होता. सरकारनेही वेग दाखवायला हवा होता,” असं म्हणत त्यांनी सरकारवर बोट ठेवलं. कायद्याचा सन्मान राखला गेला असता, तर समाजात चांगला संदेश गेला असता, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
मात्र, खरी राजकीय ठिणगी पोस्टच्या शेवटी पडली. “आम्ही मात्र मंत्री शिरसाठ यांच्याही विकेटची वाट पाहतोय,” असं थेट विधान करत रोहित पवारांनी पुढील लक्ष्य स्पष्ट केलं. त्यामुळे आता कोकाटेंनंतर राजकीय पटावर पुढची विकेट नेमकी कुणाची पडणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
