राज्यात लवकरच लसीकरणाची प्रक्रिया ; पहिल्या दिवशी ५० हजार जणांना मिळेल लस

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १३ जानेवारी – राज्यात लवकरच लसीकरणाची प्रक्रिया वेगाने सुरू होणार आहे. लसीकरणाच्या पहिल्या दिवशी राज्यातील ५० हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लसीचा डोस देण्यात येईल. देशभरात १६ जानेवारी रोजी लसीकरण सुरू होणार असून राज्यातील ५११ केंद्रातील १०० जणांच्या बॅचला लसीचा डाेस दिला जाणार आहे. मुंबईत सर्वाधिक ७२ लसीकरण केंद्र असून त्या पाठोपाठ पुण्यात ५५ केंद्र आहेत.

राज्यात पुढील दोन महिन्यांत ८ लाख आराेग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येईल. प्रत्येक केंद्रावर १०० कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यात येणार आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या कोरोना प्रतिबंधक लसीमुळे सामान्य नागरिकांमधील लसीविषयीचे गैरसमज, भीतीही निघून जाईल असा विश्वास आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे.

आरोग्य विभागाचे राज्य लसीकरण अधिकारी डी. एन. पाटील यांनी सांगितले की, लसीच्या डोसची उपलब्धता निश्चित झाल्यानंतर राज्यातील लसीकरण केंद्राची क्षमता हजारापर्यंत वाढवण्यात येईल, त्यासाठी आराखड्यावर काम सुरू आहे. आतापर्यंत कोविन ॲपवर ७ लाख ८० हजार आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीकरणासाठी नोंदणी केली आहे.

राज्यातील सर्वाधिक सक्रिय रुग्ण पुण्यात
कोरोना रुग्णांचे राज्यातील मृत्यूचे प्रमाण सध्या २.५४ टक्के असून उपचाराधीन रुग्णसंख्या ५२ हजार आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.७५ टक्के आहे. राज्यात सर्वाधिक सक्रिय रुग्ण पुण्यात असून, ही संख्या १४ हजार ७७९ आहे. तर ठाणे १० हजार १४२ व मुंबईत ७ हजार ३७० काेराेना रुग्ण उपचाराधीन आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *