महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १३ जानेवारी – लॉकडाऊनमध्ये दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी राबवलेल्या ‘मोबाइलची शाळा’ या अभिनव उपक्रमाला आंतराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. साताऱ्याच्या माण तालुक्यातील एका छोट्याशा गावातील जिल्हापरिषद शाळेत शिकवणाऱ्या बालाजी जाधव यांच्या या उपक्रमाचे देशातील व देशाबाहेरील शाळांनी अनुकरण केले आहे.
सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील विजयनगर या खेडेगावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत बालाजी जाधव शिक्षक म्हणून काम करतात. ज्यांनी लॉकडाऊन सुरू होताच शाळा बंद झाल्यानंतर शाळेतील विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणपासून वंचित राहू नये यासाठी एक अभिनव उपक्रम सुरू करायचा ठरवलं. त्या उपक्रमाचं नाव होतं ‘टिचिंग थ्रू कॉन्फरन्स कॉल’…यामध्ये साध्या फोनवर कॉन्फरन्स कॉल करून एकावेळी तासाला 10 मुलांना हे गुरुजी शिकवायला लागले.
रोज 40 विद्यार्थ्यांना सकाळ सायंकाळ या दोन शिफ्टमध्ये तासाला 10-10 विद्यार्थ्यांचे वर्ग करून जाधव सर शिकवायला लागले. मोबाईल शाळा विद्यार्थ्यांना सुद्धा मग आवडायला लागली आणि विद्यार्थी मोबाइल क्लास झाल्यानंतर सुद्धा आपला घरचा अभ्यास गोष्टी रेकॉर्ड करून करायला लागले. हा उपक्रम हनी बी नेटवर्क या आंतराष्ट्रीय पुरस्कारसाठी 87 देशातील 2500 अर्जातून सर्वोत्तम 11 प्रोजेक्टमध्ये निवडला गेल्याने बालाजी जाधव यांच्या संकल्पनेला खऱ्या अर्थाने यश आले आहे
सीएसआर फंडातून विद्यार्थ्यांना 20 टॅब देऊन या मोबाइल शाळेत गोष्टीरुपात अभ्यास शिकवण्याच तंत्र विकसित करून 500 गोष्टी दुसरी ते चौथी वर्गासाठी रेकॉर्ड करून ठेवल्या आहेत. लॉकडाऊनमध्ये ज्या ठिकाणी इंटरनेट नाही त्या ठिकाणी कसं शिकवायचे ? यासाठी खास ऑनलाइन मार्गदर्शन जाधव सरांनी केल्याने ही कॉन्फरन्स मोबाईल टिचिंग टेक्निकचे अनुकरण राज्यातील 15 जिल्ह्यात, 24 राज्यात आणि 14 परदेशातील शाळांनी करून अभ्यासक्रम शिकवला आहे.