पंतला वरच्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्याच्या कर्णधार रहाणेचा मास्टरस्ट्रोक ; पॉन्टिंग

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १३ जानेवारी – सिडनी कसोटीच्या पाचव्या दिवशी भारतीय संघ फलंदाजीसाठी मैदानावर उतरला, तेव्हा परिस्थिती अस्थिर होती. कर्णधार अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पूजारा फलंदाजीसाठी मैदानावर उतरले, तेव्हा आठ विकेट शिल्लक होत्या. भारतीय संघासमोर विराट लक्ष्य होते. दिवसाच्या दुसऱ्याच षटकात रहाणे बाद झाला. त्यावेळी भारतीय संघाचा डाव लवकर गुंडाळला जाईल असे वाटले होते.

पण त्याचवेळी कर्णधार रहाणेने अनपेक्षित चाल खेळली. सर्वजण हनुमा विहारी फलंदाजीला येईल आणि कसोटी अनिर्णीत राखण्यासाठी भारत प्रयत्न करेल, अशी अपेक्षा करत होते. पण रहाणेने यष्टीरक्षक ऋषभ पंतला बढती देत मैदानावर पाठवले. त्याने ९७ धावांची आक्रमक खेळी करुन भारताच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या. भारत या कसोटीत विजय मिळवू शकला नाही. पण हनुमा विहारी आणि आर. अश्विन यांनी ही कसोटी अनिर्णीत ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने ऋषभ पंतला वरच्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्याच्या अजिंक्य रहाणेच्या निर्णयाचे कौतुक केले. हा निर्णय म्हणजे मास्टरस्ट्रोक होता असे पाँटिंगने म्हटले आहे. “कर्णधार या नात्याने ऋषभ पंतला वरती फलंदाजीला पाठवण्याचा निर्णय खूपच चांगला होता. संघाच्या विजयाच्या आशा कायम राखण्यासाठी त्यांना तसे करणे भाग होते. पेनने ऋषभ पंतचे काही झेल सोडल्यामुळे त्याला नशिबाची सुद्धा साथ मिळाली” असे पाँटिंगने म्हटले आहे. “पंतला मैदानावर पाठवण्याचा निर्णय मास्टरस्ट्रोक होता. त्याने चांगला खेळ केला. तो त्याच्या पद्धतीने आत्मविश्वासाने खेळला” अशा शब्दात पाँटिंगने पंतचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *