महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १४ जानेवारी -मला स्वतःला आयपीएलचे व्यासपीठ आवडते. पण, मागील आवृत्तीतील आयपीएल स्पर्धेची वेळ पूर्णपणे चुकीची होती. ती वेळ चुकल्यामुळेच खेळाडूंच्या दुखापती सध्या उफाळून आल्या आहेत आणि याचा भारत व ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांना फटका बसला आहे, अशी टीका ऑस्ट्रेलियन संघाचे मुख्य प्रशिक्षक जस्टीन लँगरने केली. कोव्हिड-19 च्या अस्मानी संकटामुळे मागील आयपीएल स्पर्धा सप्टेंबर-नोव्हेंबर या कालावधीत संयुक्त अरब अमिरातीत खेळवली गेली. एरवी ही स्पर्धा एप्रिल ते मे या कालावधीत भारतात खेळवली जाते.
आयपीएल स्पर्धेनंतर भारतीय खेळाडू सातत्याने दुखापतग्रस्त होत आले आहेत आणि सध्या सुरु असलेल्या मालिकेत त्याचा आणखी कहर झाला. अगदी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू देखील विविध दुखापतींमुळे जायबंदी झाले आहेत.
‘या हंगामात किती दुखापती झाल्या, याची काही गणतीच आता राहिलेली नाही. आयपीएलसारखी प्रदीर्घ चालणारी स्पर्धा चुकीच्या वेळी आयोजित केली गेली तर त्याचे असे दुष्परिणाम होणारच’, असे लँगरने या आभासी पत्रकार परिषदेत पुढे नमूद केले.
सध्या दुखापतग्रस्त खेळाडूंमध्ये रवींद्र जडेजा व जसप्रित बुमराह यांचा नव्याने समावेश केला गेला असून यापैकी जडेजाला अंगठय़ाची तर बुमराहच्या पोटाचे स्नायू दुखावले आहेत. यापूर्वी, केएल राहुल, मोहम्मद शमी व उमेश यादव हे देखील विविध दुखापतीमुळेच मालिकेतून बाहेर फेकले गेले.
ऑस्ट्रेलियाला डेव्हिड वॉर्नर दुखापतग्रस्त झाल्याने मोठा धक्का सोसावा लागला. पण, त्यांच्या सुदैवाने तो शेवटच्या दोन कसोटीसाठी वेळेत तंदुरुस्त होऊ शकला. दरम्यान, लँगरने दुसरी बाजू लावून धरत आयपीएल स्पर्धेच्या योगदानाचाही उल्लेख केला.
‘मला स्वतःला आयपीएल स्पर्धा आवडते. आमच्या खेळाडूंना कौंटी क्रिकेटबद्दल जी आत्मीयता आहे, ती मला आयपीएलबद्दल आहे. आमचे खेळाडू कौंटी खेळतात आणि त्यांच्या खेळातही वेगळी प्रगल्भता येते. अशा स्पर्धांच्या माध्यमातूनच खेळाडूंची जडणघडण होते. मात्र, मागील आवृत्तीच्या आयपीएल स्पर्धेची वेळ चुकीची होती. पुन्हा स्पर्धेच्या वेळेत बदल करावा लागला तर या बाबीचा विचार केला जाईल, अशी अपेक्षा आहे’, असे लँगर म्हणाला.
‘बुमराह व जडेजा खेळत नसतील तर याचा लढतीवर निश्चितपणाने परिणाम जाणवेल. पण, या हंगामातील एखाद्या मालिकेतील सर्वात निर्णायक लढत येथे होणार आहे’, असे लँगरने भारताविरुद्ध चौथ्या व शेवटच्या कसोटी सामन्याच्या पार्श्वभूमीवर नमूद केले. भारतीय संघ अंतिम लाईनअप कशी आखणार, यापेक्षा आपल्या संघाची रणनीती कशी असेल, यावर अधिक लक्ष देणार असल्याचे लँगरने सांगितले. उभय संघातील 4 कसोटी सामन्यांची ही मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. चौथी कसोटी उद्यापासून (शुक्रवार दि. 15) खेळवली जाणार असून सोनी सिक्स, सोनी टेन 1 व सोनी टेन 3 या वाहिन्यांवरुन त्याचे थेट प्रक्षेपण केले जाईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे 5 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे.