राजेश टोपेंच्या कमी डोसच्या आरोपाला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं प्रत्युत्तर

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १५ जानेवारी – कोरोना लसीच्या (Corona Vaccine) वापरला आरोग्य यंत्रणांनी परवानगी दिल्यानंतर देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिट्यूट यांच्या लशी पोहोचवण्याचं काम सुरू झालं आहे. पण महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या लशी कमी मिळाल्याचा आरोप आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी केला. राजेश टोपे यांच्या आरोपांना आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रत्युत्तर दिलं आहे. राजेश टोपे यांनी केलेले हे आरोप केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने फेटाळून लावले आहेत.

कोव्हिशिल्ड (Covishield) आणि कोव्हॅक्सिन (Co Vaccine) यांचे 1.65 कोटी डोस देशाची सगळी राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांच्यात असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा डेटा पाहून वाटण्यात आले आहेत. त्यामुळे कोणत्याही राज्यावर अन्याय झाल्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कोरोना लशीचा हा सुरूवातीचा पुरवठा आहे. पुढच्या काही आठवड्यांमध्ये हा पुरवठा आणखी वाढवला जाईल, त्यामुळे कमी कोरोना डोस दिल्याचा आरोप बिनबुडाचा आहे, असं आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे.

राज्य सरकारांनी त्यांना मिळालेले 10 टक्के डोस रिझर्व्ह किंवा नुकसानीसाठी ठेवायचा आहे. तसंच दिवसाला एका केंद्रावर 100 लशी द्यायच्या आहेत. प्रत्येक केंद्रावर राज्य सरकारने जास्त लशी देऊन गोंधळ वाढवू नये, तसंच घाई करू नये, अशी गाईडलाईन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सगळ्या राज्यांना दिली आहे.जसजसा लशीचा पुरवठा वाढत जाईल, तसंच राज्य सरकार आणि केंद्र शासित प्रदेशांनी डोस द्यायची संख्या आणि केंद्र वाढवावीत, असा सल्लाही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *