महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. १८ जानेवारी – जागतिक बाजारपेठेत क्रूड तेलाचे दर काही प्रमाणात नरम झाले असले तरी भारतात पेट्रोल, डिझेलची दरवाढ सुरू आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी पेट्रोल व डिझेलच्या दरात 25 पैशांनी वाढ केली. ताज्या दरवाढीनंतर देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलचे लिटरचे दर 84.95 रुपयांवर तर डिझेलचे दर 75.13 रुपयांवर गेले आहेत. (petrol prices touches high in India)
दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर आतापर्यंतच्या उच्चांकी स्तरावर आहेत. 1 जानेवारीपासून पेट्रोलच्या दरात लिटरमागे 1.24 रुपयांची वाढ झाली आहे. दुसरीकडे डिझेल दरात 1.26 रुपयांची वाढ झाली आहे.
कर्नाटकची राजधानी बंगळूरमध्ये पेट्रोल, डिझेलचे दर क्रमश 87.82 आणि 79.67 रुपयांवर गेले आहेत. कोलकाता येथे हेच दर क्रमश 86.39 आणि 78.72 रुपयांवर गेले आहेत. मुंबईमध्ये पेट्रोलचे दर 91.56 रूपयांवर तर डिझेलचे दर 81.87 रुपयांवर गेले आहेत. तामिळनाडूमधील चेन्नई येथे इंधन दर क्रमश 87.63 व 80.43 रुपयावर गेले आहेत.