चार आठवड्यांच्या पूर्वानुमानानुसार; फेब्रुवारीतही पाऊस पडण्याची शक्यता

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २२ जानेवारी – जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये पावसाळी वातावरण, शिडकावा याचा अनुभव घेतल्यानंतर पुन्हा फेब्रुवारीच्या सुरुवातीलाही हाच अनुभव घ्यायला लागेल अशी शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागाने गुरुवारी वर्तवलेल्या चार आठवड्यांच्या पूर्वानुमानानुसार ५ फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाळी वातावरणाचा अंदाज आहे.

गुरुवारी जारी करण्यात आलेल्या पूर्वानुमानानुसार २२ ते २८ जानेवारी आणि २९ जानेवारी ते ४ फेब्रुवारी या कालावधीत मध्य भारतात वातावरण कोरडे असेल. उत्तरेकडील पट्ट्यात आणि दक्षिण टोकाला काही प्रमाणात पावसाची शक्यता आहे. मात्र त्यानंतर कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याध्ये तुरळक ठिकाणी पावसाळी वातावरण निर्माण होण्याचा अंदाज आहे. ५ ते ११ फेब्रुवारी या कालावधीत कोकणामध्ये हे वातावरण अधिक प्रमाणात जाणवेल. तर, त्यानंतरच्या आठवड्यात म्हणजे १२ ते १८ फेब्रुवारीदरम्यान महाराष्ट्रात इतरही ठिकाणी हा प्रभाव जाणवेल. चौथ्या आठवड्यामध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचा अंदाज असल्याचे, प्रादेशिक हवामान विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी गुरुवारी जारी झालेल्या पूर्वानुमानानंतर स्पष्ट केले आहे. मात्र याबद्दल अधिक माहिती जानेवारीच्या अखेरच्या आठवड्यामध्ये मिळू शकेल. सर्वसाधारणपणे पूर्वानुमान देताना पहिल्या दोन आठवड्यांचा अंदाज अधिक अचूक असतो. तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यातील अंदाजाबद्दल खूप खात्री देता येत नाही.

या पूर्वानुमानानुसार जानेवारीच्या अखेरच्या काही दिवसांपासून फेब्रुवारीच्या सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा खाली उतरलेला राज्याच्या काही भागांमध्ये जाणवेल. कमाल तापमानातही या काळात किंचित दिलासा मिळू शकेल. मात्र ५ फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा कमाल तापमानाची तीव्रता जाणवेल, अशी शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *