महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २२ जानेवारी – भारतीय रिझर्व्ह बँकेने स्टँडर्ड चार्टर्ड बँकेला रुपये 2 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. बँकेच्या फसवणूकीसंदर्भात माहिती देण्यास उशीर झाल्याबद्दल रिझर्व्ह बँकेने स्टँडर्ड चार्टर्ड बँकेला दोन कोटी रुपये दंड ठोठावला आहे. केंद्रीय बँकेच्या सूचनांचे पालन न केल्यामुळे स्टँडर्ड चार्टर्ड बँकेवर हा आर्थिक दंड आकारण्यात आला आहे. (RBI penalty 2 Crore On Standard Chartered Bank)
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया दिशानिर्देश 2016 अंतर्गत, व्यावसायिक बँकांकडून घोटाळा/ फसवणूक वर्गीकरण आणि अधिसूचित करण्याचे निर्देश आहेत. याच निर्देशाकडे स्टँडर्ड चार्टर्ड बँकेने दुर्लक्ष केलं. याच कारणास्तव रिझर्व्ह बँकेने दंड ठोठावला आहे.
31 मार्च 2018 आणि 31 मार्च 2019 रोजी बँकेच्या वैधानिक तपासणी दरम्यान सापडलेल्या फसवणूकीचा खुलासा करण्यास उशीर केल्याबद्दल आरबीआयने दंड ठोठावण्यात आला आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय बँकेने दिली.
यापूर्वी बँकेला नोटीस बजावण्यात आली होती, ज्यामध्ये कारणे दाखवा नोटीस बजावताना सांगितले होते की सूचनांचे पालन न केल्याने बँकेला दंड का लावला जाऊ नये. बँकेला जेव्हा कारणे दाखवा नोटीसीला उत्तर दिलं आणि आरबीआयने बँकेच्या उत्तराचा विचार केल्यानंतर असा निष्कर्ष काढला की केंद्रीय निर्देशांचे पालन न केल्याने बँकेला दंड ठोठावा लागेल.
मागील काही काळापासून बँका घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांकडे दुर्लक्ष करतात आणि त्यांना अडथळे येण्याचे प्रकार वाढत आहेत. बँकांवरील कारवाईचे अहवाल बँकेच्या खातेदारांचं लक्ष वेधून घेतात. अशा परिस्थितीत आपले पैसे तर सुरक्षित आहेत ना?, याची भीती खातेदारांच्या मनात असते.
मात्र स्टँडर्ड चार्टर्ड बँकेला ठोठावलेल्या दंडामुळे खातेदारांच्या पैशांवर कोणताही परिणाम होणार नाही, असे आरबीआयने स्पष्ट केले आहे. रिझर्व्ह बँकेने पुढे म्हटले आहे की, ‘स्टँडर्ड चार्टर्ड बॅंकेविरुद्धची कारवाई नियामक पालनातील कमतरतेवर आधारित आहे. बँका आणि ग्राहकांमधील कोणत्याही व्यवहाराची किंवा कराराच्या वैधतेवर निकाल देणे, हा दंडापाठीमागचा हेतू नाही.