महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २२ जानेवारी – पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो आता जगातील सर्वाधिक गोल करणारा खेळाडू बनला. इटलीचा क्लब युवेंट्सकडून खेळणाऱ्या या सुपरस्टार फुटबाॅलपटूच्या नावे आता विक्रमी ७६० गाेलची नाेंद झाली आहे. याच कामगिरीतून त्याने सर्वाधिक गाेलच्या विक्रमामध्ये चेक गणराज्याच्या जोसेफ बिकेनला मागे टाकले. मात्र, ३५ वर्षीय रोनाल्डोला बिकेनचा विक्रम मोडण्यासाठी त्याच्यापेक्षा दुप्पट सामने खेळावे लागले. बिकेनने ४९५ सामन्यांत ७५९ गोल केले, तर रोनाल्डोला ७६० गोल करण्यासाठी १०३७ सामने खेळावे लागले. बिकेनने प्रत्येक सामन्यात सरासरी १.५३ गोल केले आणि रोनाल्डोने प्रति सामना केवळ ०.७३ गोल केले.
रोनाल्डोच्या गोलच्या बळावर युवेंट्सने सुपर कोपा इटालियनमध्ये एकतर्फी विजयाची नाेंद केली. या क्लबने रंगतदार सामन्यात नेपाेलीवर मात केली. युवेंट्सने २-० अशा फरकाने सामना जिंकला.
क्लबच्या विजयासाठी रोनाल्डोने ६४ व्या मिनिटाला आणि अल्वारो मोराताने ९०+५ मिनिटाला गोल केला. युवेंट्सने विक्रमी आठ वेळा किताब जिंकला आहे. हा रोनाल्डोचा युवेंट्सकडून चौथा किताब ठरला. युवेंट्सच्या आंद्रे पिरलोचे हे प्रशिक्षक म्हणून पहिले विजेतेपद ठरले. त्यांनी खेळाडू म्हणून तीन वेळा विजेतेपद मिळवले आहे.