महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २२. जानेवारी – ऑस्ट्रेलियन दौऱ्यात पदार्पण केलेला आणि आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या बळावर ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या विकेट्स पटकाविलेल्या मोहम्मद सिराजने मायदेशी परत आल्यावर घरी न जाता थेट वडिलांच्या कबरीचे दर्शन घेतले. मोहम्मद सिराजच्या वडिलांचे नोव्हेंबर महिन्यात फुफुसाच्या आजाराने निधन झाले होते. त्यावेळी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असल्यामुळे आणि बायो बबलमुळे त्यास वडिलांचे अंतिम दर्शन घेता आले नव्हते. (Siraj pays tribute to his father at Hydarabad)
मोहम्मद सिराज हा मूळचा हैदराबाद येथील आहे. त्याचे वडील हे सर्वसामान्य रिक्षाचालक होते. मुलाच्या क्रिकेट स्वप्नांसाठी त्यांनी आपली सारी जमापुंजी सिराजसाठी खर्च केली. आपल्या मुलाला देशासाठी खेळताना त्यांना पाहायचे होते. मात्र तत्पूर्वीच त्यांचे हैदराबाद येथे एका हॉस्पिटलमध्ये निधन झाले. बायो बबलच्या अटींमुळे त्यावेळी सिराज ऑस्ट्रेलिया दौरा सोडून परत येऊ शकला नाही. वडिलांचे अंत्यदर्शन घेता न आल्यामुळे आणि देशासाठी आपण खेळतोय हे आपल्या वडिलांना पाहता न आल्यामुळे सिराज काहीसा भावुक झाला होता, हे राष्ट्रगीतावेळी पाणावलेल्या त्याच्या डोळ्यांतून दिसले होते.
म्हणूनच ऑस्ट्रेलिया दौऱ्यात चमकदार कामगिरी केलेला सिराज मायदेशी परत आल्यावर घरी न जाता थेट वडिलांच्या कबरीच्या दर्शनास पोहोचला. वडिलांच्या कबरीचे दर्शन घेतल्यावर त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला की,” माझ्या सर्व विकेट्स या माझ्या वडिलांना अर्पण करतो. वडिलांच्या मृत्यूने मला वर्णभेदी शेरेबाजी विरुद्ध लढण्याचे मानसिक बळ मिळाले.”